रायगड जि. प. व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रंगत वाढली
५०२ उमेदवार रिंगणात; जिल्हा परिषद १८८, पंचायत समितीच्या ३२७ जणांची माघार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : रायगड जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी (ता. २७) संपुष्टात आली. या मुदतीअखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण ५०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि १५ पंचायत समित्यांच्या ११८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या १८८ तर पंचायत समितीच्या ३२७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेसाठी १७३ तर पंचायत समितीसाठी ३२९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात शिल्लक राहिले असून, एकूण ५०२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडली होती. या मुदतीत जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी एकूण ३६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ६७८ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी करण्यात आली. छाननीअंती जिल्हा परिषदेचे सात, तर पंचायत समितीचे २२ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. अर्ज छाननीनंतर व माघारीच्या प्रक्रियेमुळे अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी थेट, तर काही गणांमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने मैदानात उतरल्याने प्रचाराला वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आगामी स्थानिक राजकारणाची दिशा या निकालांवर ठरणार आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
धामणे गणातून शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध
महाड (बातमीदार) : महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच गटांतून निवडणुकीसाठी १४ उमेदवार, तर पंचायत समितीच्या नऊ गणांसाठी निवडणुकीसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धामणे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव यांची या गणातून बिनविरोध निवड झाली आहे. महाडमध्ये जिल्हा परिषदेसाठी २५ उमेदवारांनी, तर पंचायत समितीसाठी ४३ उमेदवार आणि असे एकूण ६८ अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदसाठी ११ तर पंचायत समितीसाठी १९ अशा एकूण ३० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता जिल्हा परिषदेच्या पाच जागांकरिता १४ उमेदवार आणि पंचायत समितीच्या नऊ जागांकरिता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.