पालीत वाढती वाहतूक समस्या
बाह्यवळण मार्ग रखडल्याचा फटका भाविकांना
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १ : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली या पवित्र तीर्थक्षेत्रात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला बाह्यवळण (बायपास) मार्ग अद्याप प्रत्यक्षात न आल्याने भाविक, पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि अवजड वाहतुकीमुळे पाली शहर अक्षरशः गुदमरले आहे.
पाली हे तालुक्याचे ठिकाण असून, बल्लाळेश्वर मंदिरामुळे वर्षभर भाविकांची गर्दी असते. त्यातच बाजारपेठ, जुने एस.टी. स्टँड, गांधी चौक, वडेर हायस्कूल परिसर यांसारख्या भागांतील अरुंद रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होते. डम्पर, ट्रक यांसारखी अवजड वाहने शहरातूनच जात असल्याने किरकोळ कारणावरूनही मोठी कोंडी निर्माण होते. नियमबाह्य दुहेरी वाहतूक, रस्त्याच्या दुतर्फा केलेली बेकायदा पार्किंग आणि अपुऱ्या वाहतूक पोलिसांमुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
या कोंडीचा फटका केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर रुग्णवाहिका, अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीत अडकलेल्या डम्परमुळे ग्रामविकास अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून, अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चौकट
१५ वर्षांचा वनवास
पालीतील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून तब्बल १५ वर्षे उलटली गेली आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग ५४८ (अ) ला पाली-पाटणूस मार्गाशी जोडणारा हा रस्ता बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावापर्यंत जाणार आहे. यासाठी १८ कोटी रुपये रस्त्यासाठी व १० कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर असतानाही तांत्रिक अडचणी व मोबदल्यावरून शेतकऱ्यांचा विरोध यामुळे हा प्रकल्प अद्याप कागदावरच आहे.
चौकट
वाहतुकीचा अतिरिक्त ताण
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी व संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे मुंबईकडून कोकणात जाणारी आणि कोकणातून पुण्या-मुंबईकडे येणारी बहुतांश वाहतूक पालीमार्गे वळवली जाते. यामुळे तीर्थक्षेत्रातील मूळ वाहतुकीत बाहेरच्या वाहनांची मोठी भर पडत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास ही वाहने तसेच अवजड वाहने शहराबाहेरून जातील आणि पालीचा रस्ता मोकळा होईल.
कोट :
शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन बाह्यवळण मार्ग पूर्ण झाल्यास पालीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, पाली
कोट :
अतिक्रमणे, अवजड वाहतूक व चुकीचे पार्किंग यामुळे कोंडी वाढते. बाह्यवळण मार्ग झाल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होईल.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.