निवडणुका गावच्या, प्रचार मात्र ‘हायटेक’
प्रचाराचा धुरळा आता समाजमाध्यमांवर
प्रचार दौरे, रॅली आणि कामांचा लेखाजोखा ‘डिजिटल’ स्वरूपात
मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांची शक्कल
पाली, ता. १ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा घरोघरी भेटी देण्यावर भर असला, तरी यंदाच्या निवडणुकीत समाजमाध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे होताना दिसत आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून रॅली, प्रचार दौरे आणि विकासकामांचा डिजिटल प्रचार करून मतदारांना साकडे घातले जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतील १७३ उमेदवार आणि १५ पंचायत समित्यांमधील ३२९ उमेदवार रिंगणात आहेत. ७ फेब्रुवारीला मतदान होत असल्याने प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे अशक्य असल्याने उमेदवारांनी डिजिटल बॅनर, व्हिडिओंचा आधार घेतला आहे. सत्तेत असताना केलेली कामे, राबवलेल्या योजना आणि भविष्यातील अजेंडा फेसबुक, इन्स्टाग्रामवर झळकत आहे, तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांच्या उणिवा आणि भ्रष्ट कारभारावर समाजमाध्यमांतून टीकास्त्र सोडत आहेत.
फेसबुक व व्हॉट्सॲपवर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर निवडणुकांची चर्चा रंगत आहे. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे. कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली, याचे विश्लेषण सुरू आहे. याद्वारे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या निवडून येण्याच्या शक्यतांचा अंदाज बांधत आहेत. शिवाय आपल्यासोबत कोण कोण आहे, नाही, हेदेखील समजून घेत आहेत.
कार्यकर्त्यांचा व्हॉटसॲप ग्रुप
विशेष म्हणजे निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध पक्षांनी कार्यकर्त्यांचे तात्पुरते व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. प्रत्यक्ष बैठकी घेण्यापेक्षा या ग्रुपवर सभा आणि भेटीगाठींचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होत आहे.
मतदारांशी संपर्क
परगावी कामानिमित्त गेलेले मतदार निवडणुकीत निर्णायक ठरतात. या मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यम हे उत्तम साधन ठरले आहे. त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणे आणि गावाची ओढ निर्माण करून मतदानासाठी बोलावणे यावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
गावखेड्यात इंटरनेट सुविधा पोहोचल्याने स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपला अजेंडा प्रभावीपणे मांडण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर खुबीने केला जात आहे.
- सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.