फडके विद्यालयात फुलपाखरांचे जग
बग लेडी डॉ. शुभलक्ष्मी यांच्या उपस्थितीत उद्यानाचे उद्घाटन
पाली, ता. ५ (वार्ताहर) : पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने, नवीन पनवेल येथील फडके विद्यालयात नवनिर्मित ‘बटरफ्लाय गार्डन’चा (फुलपाखरू उद्यान) उद्घाटन सोहळा बुधवारी (ता. ४) पार पडला. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ नेणारा हा अनोखा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
निसर्ग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘बग लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शुभलक्ष्मी यांच्या हस्ते फित कापून या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. या विशेष सोहळ्यासाठी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित चंद्रशेखर भडसावळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरणसिंग मेहरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात चंद्रशेखर भडसावळे यांच्या हस्ते उद्यानाच्या माहिती फलकाचे अनावरण करून झाली, तर पुरणसिंह मेहरा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी त्यांनी फुलपाखरांचे जीवनचक्र, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व आणि निसर्ग साखळीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोहळ्याला शाळा समितीचे डॉ. रविकांत झिरमिटे, हितचिंतक शुक्ल, सर्व विभागांच्या मुख्याध्यापिका, पालक प्रतिनिधी उपस्थित होते. साधारणपणे इयत्ता १ ली ते ७ वी चे साडेचारशेहून अधिक विद्यार्थी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. फुलपाखरू उद्यानासारखा उपक्रम राबवून शाळेने केवळ बाग तयार केली नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि संवर्धनाची जबाबदारी रुजवली आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार निसर्गप्रेम
अतिशय देखण्या आणि कल्पक पद्धतीने साकारलेल्या या गार्डनमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला. पालक आणि हितचिंतकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
फोटो - 877
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.