शिवजयंतीनिमित्त शिक्षक नूरखाँ पठाण यांचा रक्तदानातून सामाजिक समतेचा आदर्श
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १८ ः शिवविचारांचा वारसा कृतीतून जपणारे माणगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नूरखाँ पठाण यांनी शिवजयंतीनिमित्त रक्तदान करून सामाजिक बंधुतेचा अनोखा संदेश दिला आहे. ‘माणगाव शिवजयंती उत्सव’ व ‘राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होत त्यांनी भारतीय संविधानातील ‘बंधुता’ या मूल्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना ‘रयतेचा राजा’ छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-धर्मांना एकत्र आणत उभारलेले स्वराज्य आणि समतेचा संदेश नूरखाँ पठाण आपल्या कार्यातून जपत आहेत. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता मानवतेच्या सेवेला प्राधान्य देणे, हा त्यांचा जीवनमंत्र ठरला आहे.
नूरखाँ पठाण हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर समाजप्रबोधन करणारे कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. दरवर्षी शिवजयंती आणि बकरी ईद या दोन्ही सणांच्या निमित्ताने रक्तदान करून ते ‘सण म्हणजे समाजासाठी काहीतरी देणे’ हा संदेश देतात. आजच्या विभाजनाच्या वातावरणात त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांचे मावळे ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
चौकट
प्रबोधनाचे अविरत कार्य
महाराष्ट्रभर २५० हून अधिक ठिकाणी संविधान विषयावर व्याख्याने, सोशल मीडियावर दररोज दोन मिनिटांच्या पोस्टद्वारे कलमांचे सोप्या भाषेत विश्लेषण, शिवजयंतीला रक्तदान आणि बकरी ईदला प्राण्यांच्या कुर्बानीऐवजी रक्तदान व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांतून ते समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत.
कोट
“आपले धर्म वेगळे असू शकतात, पण आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. तोच वारसा जपण्यासाठी मी रक्तदान करतो. मानवतेच्या या कार्यात सर्वांनी खारीचा वाटा उचलावा, हीच खरी शिवरायांना मानवंदना ठरेल.”
— नूरखाँ पठाण, शिक्षक, गोरेगाव-माणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.