रायगडात हरित होळीचा संदेश
वृक्षसंवर्धनासह अन्नदानातून समाजजागृती
पाली, ता. २२ (वार्ताहर) : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात यंदा ‘पर्यावरणस्नेही होळी’चा जागर अधिक व्यापक स्वरूपात होताना दिसत आहे. होळीच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंगांचा वापर टाळत समाजसेवा व पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम विविध ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) रायगडच्या वतीने “होळी लहान करा, पोळी दान करा” ही मोहीम राबवण्यात येत असून, पुरणपोळ्या संकलित करून आदिवासीवाड्यांतील गरजूंना वाटप केले जात आहे.
पेण, नागोठणे, पाली, रोहा परिसरात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अंनिसचे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी या मोहिमेमुळे हजारो गरिबांची होळी गोड होत असल्याचे सांगितले. पाली येथील रोशन रुईकर यांच्या पुढाकारातून मागील वर्षी हजाराहून अधिक पोळ्यांचे वाटप करण्यात आले होते; यंदाही ही परंपरा कायम ठेवली आहे.
रोहा तालुक्यातील वांगणी गावाने गेली १३ वर्षे हिरवी झाडे न तोडता केवळ वठलेली लाकडे वापरून प्रतीकात्मक होळी साजरी करण्याचा आदर्श घालून दिला आहे. विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी या उपक्रमाचे अनुकरण सर्वत्र व्हावे, असे आवाहन केले. सुधागड तालुक्यात महेश पोंगडे महाराज यांनी होळीच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा संदेश दिला असून, वावे गावात केतन म्हसके यांच्या नेतृत्वाखाली सुकी लाकडे वापरून होळी साजरी केली जात आहे. डॉ. अर्चना जैन व गणराज जैन हे दाम्पत्य मोठ्या होळीच्या स्पर्धेला विरोध करत जनजागृती करत आहेत.
अंनिसचे कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी, पोळी दान, कोरड्या रंगांचा वापर आणि अपशब्दांना फाटा देण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
एक गाव, एक होळी - पर्यावरणासाठी प्रभावी पर्याय
प्रत्येक गावात अनेक होळ्या पेटविण्याऐवजी एकच सामूहिक व प्रतीकात्मक होळी करण्याची संकल्पना पुढे येत आहे. यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात कमी होऊन लाकडाची बचत होते, तसेच सामाजिक ऐक्यही दृढ होते. या पद्धतीचा अवलंब जिल्हाभर झाला, तर शिमगोत्सव खऱ्या अर्थाने हरित आणि समाजाभिमुख ठरेल, असा विश्वास पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.