पाली प्रबुद्धनगरमध्ये मुख्य नाल्याचे काम चार महिन्यांपासून रखडले
घाण व दुर्गंधीचे साम्राज्य; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः येथील प्रबुद्धनगर परिसरात सुरू असलेल्या मुख्य नाल्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेले हे काम फेब्रुवारी महिना संपला तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. या अर्धवट कामामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून परिसरात दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य पसरले आहे.
प्रबुद्धनगरमधील मुख्य नाल्याच्या बांधणीचे काम प्रशासकीय संमतीने सुरू करण्यात आले होते; मात्र ठेकेदाराच्या संथ कारभारामुळे हे काम गेल्या चार महिन्यांपासून रेंगाळले आहे. यामुळे उघड्या आणि अर्धवट नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून सांडपाणी साचून राहत आहे. या पाण्यावर डास, कीटक आणि जीवजंतूंचा मोठा फैलाव झाला असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था कोलमडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रार करूनही कामाची गती वाढत नसल्याने या परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता रहिवासी विचारत आहेत. या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नोव्हेंबरपासून या नाल्याचे काम सुरू आहे; पण चार महिने उलटूनही ते पूर्ण झालेले नाही. अपूर्ण कामामुळे येथून चालणेही कठीण होते. तसेच साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि डासांचा त्रास सहन करावा लागतो. घाण साचल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करावे. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.
- सुगंधा जाधव, रहिवासी, प्रबुद्धनगर, पाली
नाल्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात ठेकेदारासोबत बोलणे झाले आहे. काही दिवसांतच नाल्याच्या राहिलेल्या कामास सुरुवात करून काम पूर्ण करण्यात येईल.
- सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, नगर पंचायत, पाली
फोटो ओळ
पाली ः प्रबुद्धनगर येथील नाल्याचे अपूर्ण काम व त्यामुळे साचलेला कचरा व दूषित पाणी.
फोटो ओळ ः पाली ः सुगंधा परेश जाधव, रहिवासी, प्रबुद्धनगर, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.