पालीच्या हटाळेश्वर चौकात रस्त्याची दैना
मोठा खड्डा ठरतोय अपघातांना निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३० (वार्ताहर) : पाली येथील हटाळेश्वर चौकात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, मुख्य चौकातच एक भला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून भाविक आणि स्थानिकांमध्ये नगरपंचायत कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी या परिसरातून जलवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा केवळ मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला. मात्र, त्यावर डांबरीकरण किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अवजड व अन्य वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे टाकण्यात आलेल्या भरावातील माती निघून गेली आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता एक खोल खड्डा तयार झाला असून आजूबाजूला माती आणि खडी पसरली आहे. खडलेल्या मातीमुळे दुचाकी घसरण्याचे शक्यता आहे, तर रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात पसरलेल्या धुळीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची झालेली ही दुरवस्था पाहता, नगरपंचायत प्रशासनाने केवळ मातीचा ढिगारा न टाकता, संबंधित खड्डा व्यवस्थित खडीकरण आणि डांबरीकरण करून बुजवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
फोटो ओळ, पाली, पालीतील हटाळेश्वर चौकात पडलेला मोठा खड्डा आणि रस्त्याची झालेली दुरवस्था. (छायाचित्र, अमित गवळे)