मृत्यूचा मुंबई-गोवा महामार्ग
रायगड जिल्हा हद्दीत १५ वर्षांमध्ये अपघातांत एक हजार २८५ जणांचा मृत्यू; किरकोळ जखमींची संख्या अगणित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : मागील १५ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, मृतांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. या महामार्गावर रायगड जिल्हा हद्दीत मागील १५ वर्षांत पाच हजार २२१ अपघात झाले असून, त्यामध्ये एक हजार २८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रखडलेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, महामार्गाच्या क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक, भरधाव वाहने अशी अनेक अपघातांची कारणे असून, यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून मिळाल्या माहितीनुसार यात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या अगणित आहे. या महामार्गावर ३२ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या १५४ किलोमीटरदरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरून दररोज सुमारे एक लाख ८५ हजार ९४२ मेट्रिक टन एवढी वाहतूक होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपासून रखडले आहे. इंदापूरच्या पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच स्थिती आहे.
महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र
मुंबई-गोवा महामार्गावर ३२ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. यामध्ये खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाचा ५०० मीटर परिसर, लोणेरे बसस्थानकाचा २०० मीटर परिसर, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले या ठिकाणांचा समावेश आहे.
जनजागृतीचे प्रयत्न अपुरे
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे त्या अगोदरच फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे १० नियम फलकाद्वारे लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांना वाहन सुरक्षित चालविण्याचे संदेश दिले जात आहेत. हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.
१४ वर्षांत एक हजार २२९ जणांचा अपघाती मृत्यू
वर्ष / एकूण अपघात /मृत्यू /जखमी
२०११/ ६११/ १३६/६१९
२०१२ /६४९ /१२४ /८५८
२०१३/ ४७४ /१२२/ ४६७
२०१४ / ४६२/ ९३/ ४३९
२०१५ /४९७ /९९/ ६२४
२०१६/ ४६०/ ११०/ ८८७
२०१७/ ३६२/७३ /३९५
२०१८ /३६२/ ९७ /४१८
२०१९/३१५/ ६७/ ४२९
२०२० / २०३/ ६८/ २३५
२०२१ /१५४/४७/ १४९
२०२२ /१७२ /५८ /१८६
२०२३ / १८३/७४/ २७९
२०२४ /१५७ /६१ /२१९
२०२५ / १६०/ ५६ /१७७
एकूण / ५,२२१ /१,२८५ / ६,४०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.