मुंबई

राजकीय अनास्थेत रखडले सिंचन प्रकल्प

CD

राजकीय अनास्थेत रखडले सिंचन प्रकल्प
सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर; निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा, सांबरकुंड, काळ-कुंभे, अंबोली यांसारखे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प रखडल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. भविष्यातील वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हे प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक असतात; परंतु येथील लोकप्रतिनिधींकडून कोणताही पाठपुरावा केला जात नाही. कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसातील पाच टक्के पाणी थांबवण्यास यश आले तरी येथील सिंचनाची समस्या कायमची सुटेल; मात्र नागरिकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा राजकारणात गुंतलेल्या राजकारण्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मागील १५ वर्षांत जिल्ह्यातील नऊ प्रमुख प्रकल्पांच्या कामात काहीही प्रगती झालेली नाही.
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा, सांबरकुंड, काळ-कुंभे, अंबोली यांसारखे प्रकल्प मार्गी लागल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेती, बागायतीसाठीही पाण्याची किमान व्यवस्था होऊ शकते; मात्र यंदा तात्पुरत्या डागडुजीशिवाय या प्रकल्पांसाठी फारसा निधी उपलब्ध झाला नसल्याचे कोलाड पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद पवार यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांदरम्यान नेतेमंडळींनी शेती आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. निवडणुकांनंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा लोकप्रतिनिधींना विसर झाल्याचे दिसून येत आहे. सिंचनाची समस्या वाढत जात असल्याने शेतीला पाणी पुरेसे मिळत नाही. यामुळे शेती क्षेत्राच्या प्रमाणातही घट होत आहे.

दहा वर्षे रखडले बाळगंगा धरण
नवी मुंबईतील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून या धरणाची निर्मिती केली जात आहे. धरणाचे पाणी हे प्रामुख्याने नवी मुंबईतील औद्योगिक प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई परिसरातील सहा ग्रामपंचायतींमधील नऊ गावे १३ वाड्यांमधील एक हजार ४०० हेक्टर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे तीन हजार ४४३ कुटुंबे बाधित होणार असून त्यांचे घर आणि जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. २००९ पासून हा प्रकल्प अपूर्ण आहे.

४० वर्षांपासून सांबरकुंड धरण कागदावरच
अलिबाग तालुक्यातील रामराज भागातील ४० वर्षांपासून रखडलेला साबरकुंड मध्यम धरण प्रकल्प अद्यापही कागदावरच राहिलेला आहे. खैरवाडी, जांबुलवाडी आणि महान हा परिसर धरणाच्या पाण्याखाली बुडीत क्षेत्र म्हणून घोषित आहे. या गावातील ३५० कुटुंबे विस्थापित होत असून १२८ हेक्टर भातशेतीही धरणाखाली जात आहे. तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन रामराजमध्येच पुनर्वसन करावे आणि भूसंपादन नियमानुसार २२ टक्के भूखंड शासनाने द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे.

कोंडाणे धरण सिकडोला हस्तांतरित
भविष्यात झपाट्याने विकसित होणाऱ्या नैना क्षेत्रातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी नवी मुंबईपासून ३५ किलोमीटर लांब असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचा सिडको नव्याने प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने अडगळीत टाकण्यात आलेले हे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. या धरणाचा मातीचा बांध हा ३९ मीटरवरून ७१ मीटर इतक्या उंचीचा केला जाणार आहे. यात २७१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होईल.

काळ-कुंभे प्रकल्प निधीअभावी रखडला
कुंभे जलविद्युत प्रकल्पाला १५ ऑक्टोबर १९९८ मध्ये ९७ कोटींची मान्यता मिळाली व तेथे जाण्या-येण्याच्या रस्त्यासाठी, बोगद्यासाठी ११ एप्रिल २००२ला वनविभागाची मान्यता मिळाली. पुढे कार्यकारी अभियंता नी. रे. करीमुंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी काळ आणि कुंभे प्रकल्पाचा आराखडा तयार केला. त्यामुळे वीजनिर्मितीबरोबर सिंचन क्षेत्रासाठी व औद्योगिक वसाहती पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले जात होते. १७ नोव्हेंबर २००६ पासून कुंभे धरणाच्या कामास सुरुवात झाली. बोगदा खणून प्रकल्पापर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला. आजच्या घडीला ७० टक्के काम होऊनही हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे.

रायगड जिल्ह्यातील सिंचनाची स्थिती
मोठे प्रकल्प- १
मध्यम प्रकल्प- ४
लघुसिंचन प्रकल्प (राज्य) - २८
लघुसिंचन प्रकल्प (स्थानिक) - १६
पाझर तलाव- ३६
कोल्हापूर बंधारा- ६३
साठवण बंधारा- ५९
सिंचन विहिरी- ५,४२६
डिझेल पंप- ३३२
विद्युत पंप- १६,९६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Politics: पत्नीसाठी पदाचा गैरवापर; १५ दिवसातच रोजगार मंत्र्याला पदावरून हटवलं, नेपाळ सरकारमध्ये मोठी हालचाल

IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सला २ कोटीच्या खेळाडूने दिला दगा... रिषभ पंतच्या संघात बोलावला आफ्रिकन ऑल राऊंडर

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

SCROLL FOR NEXT