रायगडमध्ये चार हजार ३४५ विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशाची लॉटरी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : रायगड जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी झालेल्या ऑनलाइन सोडतीत चार हजार ३४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून, पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रायगड जिल्ह्यातील २७० शाळांमध्ये चार हजार ७८४ जागा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव ठेवल्या आहेत. यासाठी नऊ हजार ४८९ एकूण अर्ज प्राप्त झाले होते. राखीव जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध खासगी विनाअनुदानित शाळांमधील रिक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून संगणकीकृत प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून, पालकांना एसएमएसद्वारेही माहिती दिली आहे. यातील ६२ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये शिक्षण शुल्क, पाठ्यपुस्तके, गणवेश यांचा समावेश असून, शासनाकडून त्याचा खर्च संबंधित शाळांना दिला जाणार आहे. त्यामुळे गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ठरवून दिलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. एकूणच, या लॉटरीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून, त्यांच्या भविष्यासाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- ललिता दहीतुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी-रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.