जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था
माजी आमदार पंडित पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र; खेळाडूंचे नुकसान होत असल्याची मांडली व्यथा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : रायगड जिल्ह्याची शान आणि अलिबागची ओळख असलेल्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत माजी आमदार तथा भाजप नेते पंडित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रशासकीय अनास्थेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्याच्या राजधानीत खेळाडूंसाठी हक्काचे मैदान असतानाही त्याचा वापर केवळ मतमोजणीसाठी का, असा सवाल त्यांनी या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
पंडित पाटील यांनी पत्रात आणि चर्चेत एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा क्रीडांगणाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एमआयडीसीची पाइपलाइन टाकण्यात आली होती. याचे उद्घाटन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात स्थानिक ग्रामपंचायतीने या वाहिनीवर बेकायदा नळजोडण्या घेतल्यामुळे क्रीडांगणाला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले मैदान पाण्याच्या अभावामुळे खराब होत आहे. अलिबाग तालुक्यात आरसीएफ आणि गेल सारख्या मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. राज्य सरकारकडे क्रीडांगणाच्या देखभालीसाठी निधी नसेल, तर या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे क्रीडा संकुल अद्ययावत करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
वसतिगृहाचा वापर निवडणुकांसाठीच
क्रीडा संकुलाच्या आवारात १२० विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृह उभारण्यात आले आहे. मात्र, या वसतिगृहाचा वापर खेळाडूंसाठी होण्याऐवजी केवळ कोविड सेंटर आणि निवडणूक कामांसाठी केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. येथे कोणत्याही मोठ्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जात नाहीत, मग राज्य आणि केंद्र सरकारचा खेळाडू घडवण्याचा उद्देश कसा साध्य होणार. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
क्रीडांगणाचा वापर निवडणुकांसाठी केल्यामुळे खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येतो, त्यामुळे निवडणूक कामांसाठी अलिबागमध्ये स्वतंत्र कायमस्वरूपी कार्यालय किंवा केंद्र उभारावे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू जावे असे वाटत असेल, तर उपलब्ध मैदाने सुस्थितीत असणे ही काळाची गरज आहे.
- पंडित पाटील, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.