अन्नछत्र वाचवण्यासाठी ‘चुली’चा आधार
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानाची संकल्पना
पाली, ता. १० (वार्ताहर) : कमर्शियल गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे व दरवाढीमुळे पालीतील ऐतिहासिक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रावर संक्रांत आली आहे. सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने आता पारंपरिक ‘चुलीवर’ स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या दररोज २०० भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थानच्या वतीने येथे सवलतीच्या दरात अन्नछत्र चालवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमालीचा मंदावला आहे. दररोज एका सिलिंडरची गरज असताना, आठवड्यातून केवळ एकच सिलिंडर मिळत असल्याने आणि तेही महाग झाले असल्याने अन्नछत्र बंद पडण्याची भीती निर्माण झाली होती.
अन्नदान ही सेवा खंडित होऊ नये, यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळाने युद्धपातळीवर नियोजन करून मंदिराच्या आवारात पारंपरिक चुली मांडल्या आहेत. लाकूडफाटा वापरून मोठ्या पातेल्यांमध्ये आता महाप्रसाद तयार केला जात आहे. धूर आणि वाढीव कष्टांची तमा न बाळगता कर्मचारी ही सेवा पार पाडत आहेत.
-------------------
सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अन्नछत्र सेवा थांबवणे आम्हाला मान्य नव्हते. जोपर्यंत गॅसपुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत चुलीवर स्वयंपाक करून ही परंपरा सुरू ठेवली जाईल. भाविकांनी सध्याच्या मर्यादित व्यवस्थेला सहकार्य करावे.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, श्री बल्लाळेश्वर देवस्थान
-------------
पाली : गॅसटंचाईमुळे पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीवर प्रसाद केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.