जांभूळपाड्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
सांडपाण्याच्या खड्ड्यात डासांची उत्पत्ती; ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थ नाराज
पाली, ता. २८ (वार्ताहर) : जांभूळपाडा येथे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, गावातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाटीसाठी ग्रामपंचायतीकडून ठोस व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे.
गावातील काही नागरिकांकडून थेट अंबा नदीच्या पात्रात कचरा टाकला जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासह परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुसरीकडे मारुती देवस्थानच्या व्यायामशाळेजवळ खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे व्यायामशाळेत येणाऱ्या युवकांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाला याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची युवकांची तक्रार आहे.
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दळवी यांनी गावातील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सांगत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत आणि नागरिकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध केला नाही, तर भविष्यात जांभूळपाड्यासमोर गंभीर आरोग्य संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
उपाययोजना गरजेच्या
गावातील कचऱ्याची वाढती समस्या केवळ अस्वच्छतेपुरती मर्यादित राहिलेली नसून, त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे, तर साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नियमित कचरा संकलन सुरू करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, नदीपात्र स्वच्छ ठेवणे आणि सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
फोटो ओळ, पाली : अंबा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली : मारुती देवस्थानने व्यायामशाळेच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचले आहे. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.