खुरावले फाटा-वाघोशी रस्त्याची दुरवस्था
ऐन गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न; प्रशासकीय अनास्थेविरोधात जनक्षोभ
पाली, ता. १ (वार्ताहर) : पेण-सुधागड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पेण व सुधागड तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, त्यावर अनेक गावे, वाड्या आणि आदिवासी वस्त्या आहेत. दररोज शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनधारक या मार्गावरून प्रवास करतात. दरम्यान, रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवात चाकरमान्यांची वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोकाही अधिक आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणेही कठीण होत आहे. बससेवा व इतर वाहतूक विस्कळित झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी रस्त्याची विदारक अवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी आंदोलनही केले होते.
चौकट :
प्रशासनाची उदासीनता
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार झालेल्या या रस्त्याचा दोष निवारण कालावधी संपल्याचे सांगत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही हा रस्ता आपल्या अख्त्यारीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. भेरव येथील आंबा नदीवरील पुलाची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली; मात्र उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
कोट :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता झाला तेव्हा आमचे हाल संपतील, अशी आशा होती. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एकाच पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली. ऐन गणपती सणात आम्हाला खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला नागरिकांचा हा त्रास दिसत नाही का? रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर स्थानिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
- अमर सागळे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.