तलाठ्यांना सज्जाच्या मुख्यालयी बसण्याचे आदेश द्या
भाजप किसान मोर्चातर्फे सुधागड-पाली तहसीलदारांना निवेदन
पाली, ता. ७ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील बहुतांश तलाठी आपापल्या नेमून दिलेल्या सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित न राहता मागील अनेक वर्षांपासून तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाली येथूनच कारभार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होत असून, याबाबत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित सदाशिव बारसकर यांनी सोमवारी (ता. ७) तहसीलदार उत्तम कुंभार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आपापल्या सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहून कार्यालयीन कामकाज सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महसूल विभागातील कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांना जलद सेवा देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये इंटरनेट व नेटवर्क सुविधा उपलब्ध झाल्याने लॅपटॉप व इंटरनेटच्या माध्यमातून गावातच ऑनलाइन कामकाज करणे शक्य आहे. असे असतानाही तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपलब्ध नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रत्येक तलाठ्याचा सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा वार व वेळ निश्चित करून त्याची माहिती दर्शविणारा फलक कार्यालयाबाहेर लावण्यात यावा. तसेच सर्व तलाठ्यांना तात्काळ आपापल्या सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी बारसकर यांनी केली आहे.
चौकट
कामाचा खोळंबा
तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने ७/१२, ८-अ उतारे, विविध शासकीय दाखले आणि फेरफार नोंदींसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सज्जाच्या गावातून पाली येथे वारंवार ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाया जात आहे. तलाठी नेमणुकीच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने प्रत्यक्ष जमिनीची पाहणी, पीक पाहणी तसेच अन्य महसुली कामांनाही विलंब होत असल्याची तक्रार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.