अस्वच्छतेच्या विळख्यात ऐतिहासिक वारसा
दुर्लक्षामुळे श्री हटाळेश्वर तळ्याची कचराकुंडी ः सांडपाण्यामुळे पवित्र जलस्रोत धोक्यात
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः पालीच्या ऐतिहासिक व धार्मिक वैभवात भर घालणारे श्री हटाळेश्वर मंदिर परिसरातील तळे सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे विदारक अवस्थेत आहे. एकेकाळी स्वच्छ आणि निसर्गरम्य असलेला हा जलस्रोत आज कचराकुंडी बनला आहे. तळ्याच्या काठावरील घरांमधील शौचालयाचे पाणी, सांडपाणी आणि कचरा थेट तळ्यात जात असल्याने कमालीचे प्रदूषण वाढले आहे. वाढलेली जलपर्णी आणि सुटलेली दुर्गंधी यांमुळे भाविक व स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वीच्या काळात हे तळे गावाच्या दैनंदिन गरजा आणि भूजलपातळी टिकवण्यासाठी मुख्य आधार होते. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २५ वर्षांपूर्वी या तळ्यातील गाळ काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर नियमित देखभाल व नियोजनबद्ध संवर्धन न झाल्याने तळ्याची पाणी साठवण क्षमता घटली आहे. हे तळे केवळ गाळ काढून स्वच्छ होणार नाही, तर चारही बाजूंना संरक्षक भिंत उभारणे, सांडपाणी रोखण्यासाठी स्वतंत्र निचरा व्यवस्था करणे आणि नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. नगरपंचायतीने आमदार किंवा खासदार निधीतून या परिसराचा शास्त्रीय पद्धतीने विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाकार
सध्या पाली नगर पंचायतीकडून मधली आळी येथील तळ्याचा गाळ काढून सुशोभीकरण केले जात आहे. याच धर्तीवर हटाळेश्वर तळ्याचेही संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्या शर्मिला बोडके यांनी नगर पंचायतीकडे निवेदन सादर करून पुढाकार घेतला आहे. भाविक, लहान मुले व वृद्धांसाठी बसण्याची व्यवस्था, हिरवळ आणि सुरक्षित मार्ग उभारल्यास या धार्मिक पर्यटनस्थळाचा कायापालट होऊ शकतो, असे शर्मिला बोडके यांचे म्हणणे आहे.
श्री हटाळेश्वर देवस्थान हे या परिसराचे श्रद्धास्थान आणि सांस्कृतिक केंद्र आहे. मंदिरासोबतच मंदिराच्या तळ्याचा परिसर सुंदर आणि प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे होते. या सुशोभीकरणाच्या कामामुळे भाविकांना केवळ दर्शनाचाच नव्हे, तर तळ्याच्या काठी शांतता आणि प्रसन्नता अनुभवण्याचा आनंद मिळेल. मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपून हे काम पूर्ण केले जावे. आज आजूबाजूच्या व्यापारी संकुलांमुळे जे प्रदूषण झालेले आहे ते थांबून पालीतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून हे तळे नावारूपाला येईल.
- राजेश मपारा, अध्यक्ष, श्री हटाळेश्वर देवस्थान समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.