कोकणवासीयांची महामार्गावर कुचंबणा
पाली, ता. १३ (वार्ताहर) ः गणेशोत्सवासाठी शनिवारी (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरातून लाखो नागरिक खासगी वाहने, एसटी बस आणि ट्रॅव्हल्सने कोकणाच्या दिशेने रवाना झाले, मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांना महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि विविध ठिकाणी सुरू असलेली संथ गतीची कामे यामुळे महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेण, वडखळ, माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला होता. त्यात वरून कोसळणारा पाऊस आणि वाहने तासंतास एकाच जागी थांबून राहिल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले.
या प्रवासादरम्यान सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे महामार्गावर स्वच्छतागृहांचा अभाव. तासंतास गाड्यांमध्ये बसून राहिल्यामुळे महिला आणि लहान मुलांची मोठी कुचंबणा झाली. महामार्गाच्या कडेला मूलभूत सुविधांची कमतरता असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाटेतील हॉटेल्स आणि पेट्रोलपंपांवर प्रवाशांची अलोट गर्दी झाल्याने तिथेही दुरवस्था पाहायला मिळाली. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी गणेशभक्तांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या जन सुविधा केंद्रावरची गैरसोय समोर आणली. येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा अभाव दिसला. महामार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या वाहन दुरुस्ती केंद्रावर तसेच अल्पोपहार केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवली. क्रेनचादेखील उपयोग झाला नाही.
--------------------
रस्ते दुरुस्तीची अपूर्ण कामे, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा आणि मूलभूत सुविधांची वानवा यामुळे दरवर्षी त्रासाला सामोरे जावे लागते.
- राजेंद्र जाधव, पोलादपूर
------------
अवघे १० किमीचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागला. तसेच इंदापूरच्या इथेसुद्धा कोंडी होती. यामुळे माझ्यासह इतरांनाही खूप गैरसोय व त्रास झाला. मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अधिक कोंडी व वर्दळ होती.
- सीमा वाघपंजे, शिक्षिका, श्रीवर्धन
़़़़़़़़़़़़़़़
वाकण-पाली-खोपोली मार्गावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. परिणामी प्रवासाला वेळ लागला. कोकणाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर ताण आला होता.
- शंतनू लिमये, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.