चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
नवघर, आसानवाडी शाळांतील विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य
पाली, ता. १६ (वार्ताहर) : आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत शनिवारी (ता. १२) रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा, नवघर आणि रायगड जिल्हा परिषद शाळा, आसानवाडी येथे विद्यार्थ्यांनी शाडू व लाल मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला.
नवघर शाळेत विद्यार्थ्यांना शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी स्वतः चिकणमाती आणून गटनिहाय गणेशमूर्ती साकारल्या. कलात्मकता, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत ‘मातीची मूर्ती - निसर्गाची हमी’ हा संदेश देण्यात आला. शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट केले. प्लॅस्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक सजावट करणे, ध्वनी व जलप्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक विसर्जनाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापिका संगीता बैकर, राजेंद्र अंबिके, वृषाली गुरव आणि रुपाली लेंडवे यांनी नियोजन केले.
आसानवाडी शाळेत लाल व शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हस्तकला, कला शिक्षण, कार्यशिक्षण व कार्यानुभवाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्याध्यापक गोरख आघाव व सहाय्यक शिक्षिका प्रियांका असलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला.
पर्यावरण संवर्धनाचे धडे
मातीपासून गणेशमूर्ती घडवताना विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजली. शाडू व नैसर्गिक मातीच्या मूर्तींचा वापर, प्लॅस्टिकला टाळणे, नैसर्गिक सजावट तसेच ध्वनी व जलप्रदूषण रोखण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे बालवयातच कलेसोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.
फोटो ओळ, पाली : मातीपासून गणेशमूर्ती तयार करताना नवघर शाळेतील विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली : मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती दाखवताना नवघर शाळेतील विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.