शक्ती-तुऱ्याच्या सामन्याने रंगत
नाडसूरमध्ये हजारो रसिकांची उपस्थिती; तरुणाईकडून परंपरांचे जतन
पाली, ता. १८ (वार्ताहर) : महाराष्ट्राला लाभलेली लोककलेची समृद्ध परंपरा गणेशोत्सवाच्या काळात कोकणात अधिकच चैतन्यमयी होते. गणरायाच्या आगमनाने रायगड जिल्ह्यातील गावागावांत ढोलकीचा ताल, टाळांचा गजर आणि जाखडी नृत्याची रंगत पाहायला मिळत आहे. याच परंपरेचा अनोखा आविष्कार शुक्रवारी (ता. १८) सुधागड तालुक्यातील नाडसूर येथे पाहायला मिळाला. शक्ती-तुऱ्याच्या जंगी सामन्यासह बाल्या नृत्याच्या आविष्काराने हजारो रसिकांची मने जिंकली.
सुधागड पंचायत समितीचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदेश परशुराम शेवाळे यांच्या वतीने नाडसूर येथील वैतागवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी २ वाजता सुरू झालेल्या या लोककला सोहळ्यात तांडदेव घराण्याचे तुरेवाले शाहीर योगेश जाधव (पहूर-रोहा) आणि भानुदास घराण्याच्या शक्तिवाल्या वृदाली दळवी (महाडिक) यांच्यात कलगीतुऱ्याची चुरशीची जुगलबंदी रंगली. पौराणिक कथा, आध्यात्मिक चिंतन आणि लोकसंगीताच्या सुरेल मिलाफाने रंगलेल्या या सामन्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तरुणाईकडून परंपरेचे संवर्धन
कोकणातील बाल्या नाच, जाखडी नृत्य, भजन आणि कीर्तनाचे ताफे सध्या गावोगावी सक्रिय झाले आहेत. लोप पावत चाललेल्या या लोककलांना नवसंजीवनी देण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे. सुधागड तालुक्यातील श्री दत्त गुरु नाच मंडळ आणि चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने तब्बल २२ वर्षांनंतर जाखडी नृत्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे. यात पदवीधर, अभियंते तसेच युवतींचाही सहभाग आहे. पेण तालुक्यातील दुरशेत येथील तरुणही १६ वर्षांपासून ही कला जोपासत आहेत.
नाडसूर येथील कार्यक्रमातून कोकणच्या लोककलेचा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला.
फोटो ओळ, पाली, शक्ती तुऱ्याचे रंगलेले सामने. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.