पालीत सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ
बल्लाळेश्वर मंदिरातून अभियानाला सुरुवात
पाली, ता. ७ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीतून बुधवारी (ता. ७) ‘सेवा ज्योती यात्रे’चा प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले.
७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. तेथून सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास २०१४ पासून देशाचे पंतप्रधान म्हणून सुरू आहे. राष्ट्रविकास आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या या प्रवासाच्या स्मरणार्थ देशभरातील संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये अभियान राबविण्यात येत आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, गुजरातचा कायापालट, गरिबांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे, ‘मेक इन इंडिया’, चंद्रयान मोहीम तसेच कोरोना काळातील १०० कोटींहून अधिक लसीकरण अशा विविध उपक्रमांतून भारताने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचे आशीर्वाद घेऊन सुरू झालेली यात्रा संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून, सामाजिक योगदान देणाऱ्यांचा सन्मान आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार धैर्यशील पाटील, अभियान प्रमुख तथा जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील, भाजप नेत्या गिता पालरेचा, आलाप मेहता, पंचायत समिती सभापती जागृती मानकर, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणाली शेठ, नगराध्यक्ष पराग मेहता, अमित घाग, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वारगुडा, चंद्रकांत घोसाळकर, शर्मिला पाटील, अरिफ मनियार, सुजित बारसकर, शरद चोरगे, विठ्ठल सिंदकर, रोहन दगडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीतील अधिकारावर भर
राजकीय आंदोलनांविषयी विचारलेल्या प्रश्नावर रायगड जिल्हाध्यक्ष व माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असून, सरकार पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पालीतील नियोजनाबद्दल त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर असल्याचे नमूद केले. विकसित भारत दर्शविणारी रांगोळी साकारल्याबद्दल अर्चना शेडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.