‘मोफत साडी’ला अल्प प्रतिसाद
३२.१४ टक्के साड्या अजूनही शिल्लक; पनवेलमध्ये सर्वाधिक साठा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त रेशन दुकानांमधून करण्यात आलेल्या मोफत साडी वाटपाला रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्ह्यासाठी मागविण्यात आलेल्या ७४ हजार ७२६ साड्यांपैकी ६७.८६ टक्के साड्यांचेच वाटप झाले असून, ३२.१४ टक्के साड्या अद्याप शिल्लक आहेत. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यात केवळ चार टक्के साड्यांचे वाटप झाले असून, तब्बल ९६ टक्के साड्या शिल्लक आहेत.
गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडी वाटपाला सुरुवात करण्यात आली होती. २०२३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. ‘मोफत साडी योजना’ किंवा ‘कॅपटीव्ह मार्केट योजना’ या नावाने ती ओळखली जाते. मात्र, मागील वर्षी दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने साडी वाटप झाले नव्हते. यंदा रेशन धान्यासोबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साड्यांचे वितरण करण्यात आले.
या योजनेच्या अंमलबजावणीचे काम महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या नोडल एजन्सीमार्फत केले जाते. महामंडळाकडून साड्यांचे गठ्ठे तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुकास्तरीय गोदामांमध्ये पोहोचविण्यात आले आहेत. साडी उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक आणि हमालीचा खर्च राज्य शासनाकडून महामंडळाला दिला जातो. शासनाच्या धोरणानुसार २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित करण्यात आली आहे.
---
एक साडी ४०० रुपयांची
२०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी त्यात ४५ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
---
शहरी भागात अल्प प्रतिसाद
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये साडी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र तालुकानिहाय वितरणामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. पनवेल तालुक्यात मंजूर साड्यांपैकी केवळ चार टक्के साड्यांचे वाटप झाले आहे. त्यामुळे येथे तब्बल ९६ टक्के साड्या अद्याप शिल्लक आहेत. पनवेलनंतर कर्जत तालुक्यातही वाटपाचे प्रमाण केवळ २२.३३ टक्के आहे. दुसरीकडे पेणमध्ये सर्वाधिक ९७.४४ टक्के, अलिबागमध्ये ९०.६६ टक्के, महाडमध्ये ९०.०९ टक्के, पोलादपूरमध्ये ८९.४० टक्के आणि माणगावमध्ये ८८.२३ टक्के साड्यांचे वाटप झाले आहे. श्रीवर्धनमध्ये सुमारे ७८ टक्के, तर रोहा आणि खालापूरमध्ये सुमारे ६४ टक्के वाटप झाले आहे.
---
साड्या वाटपाचे ठळक आकडे
मंजूर साड्या : सुमारे ७.४७ लाख
वाटप झाले : ६७.८६ टक्के
शिल्लक : ३२.१४ टक्के
पनवेल वाटप : केवळ ४ टक्के
कर्जत वाटप : २२.३३ टक्के
पेण वाटप : ९७.४४ टक्के
---
गणेशोत्सव कालावधीत साड्यांचे वाटप केले जात होते. रायगड जिल्ह्यासाठी एकूण ७४ हजार ७२६ साड्या मागवण्यात आलेल्या होत्या. यातील ६७.८६ टक्के साड्यांचे वाटप झालेले आहे. अद्याप काही साड्या शिल्लक आहेत. त्याचे वाटप सुरू आहे.
- डॉ. रवींद्र शेळके, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.