वन्यजीवांसाठी वनतलाव ठरणार जीवनदायी
पाणीसाठा वाढविण्यासाठी संयुक्त पुढाकार; स्थानिकांना रोजगाराच्या संधी
पाली, ता. २५ (वार्ताहर) : वाढते तापमान, दुष्काळ, वणवे आणि जैवविविधतेचा ऱ्हास या संकटांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी नेरे नानोसे येथे वनतलाव खोदण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जल व वन संवर्धनासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून स्थलांतर रोखण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी या मोहिमेचे कौतुक करून प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
सामूहिक वनव्यवस्थापन समिती (नेरे नानोसे), वन विभाग, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पंचायत समिती (सुधागड पाली), वातावरण फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्या समन्वयातून सामूहिक वनहक्क क्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २३) कंपार्टमेंट क्रमांक ६५९ मधील वनक्षेत्रात खुटवड यांच्या हस्ते प्रतीकात्मक खोदकाम करून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
मानव संकटात स्वतःचा मार्ग शोधू शकतो; मात्र मूक वन्यजीवांचे संरक्षण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करीत खुटवड यांनी समितीच्या कार्याला दिशादर्शक म्हटले. गटविकास अधिकारी लता मोहिते, आयटीडीपी पेणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोलसकर आणि वनरक्षक गुलचंद काकडे यांनीही उपक्रमाचे कौतुक केले.
प्रशासन, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदाय यांच्या समन्वयातून जलसुरक्षा मजबूत होण्याबरोबरच आदिवासी वाड्यांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. रोजगाराच्या संधी वाढल्याने स्थलांतर रोखण्यास आणि वनसंरक्षणासाठी स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भगवान केसभट यांनी आभार मानले.
पंधरा गावांत सौरदिव्यांची सुविधा
बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख श्रेया सुधीर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. सुधागड तालुक्यातील १५ गावांमध्ये १०० सौर पथदिवे बसविण्यासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यास हातभार लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.