नदीपात्रात अतिक्रमण
अनधिकृत कामे रोखण्यासाठी ग्रामस्थांचा १५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
पाली, ता. ५ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील आरडेचीवाडी (हेदवली), कानसळ आणि दहिगाव परिसरातील नदीपात्रात सुरू असलेले अनधिकृत उत्खनन, बांधकामे आणि वॉल कंपाउंडमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने आगामी पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ५) ग्रामस्थांनी सुधागड तहसीलदारांना निवेदन देऊन पाटबंधारे विभागालाही पत्रव्यवहार केला. दोन्ही विभागांनी १५ दिवसांत संयुक्त पाहणी करून अनधिकृत कामांवर कारवाई करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नदी ही परिसराच्या पर्यावरणीय संतुलनाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाची आहे, मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून, नदीच्या हद्दीचे उल्लंघन करून बांधकामे केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदीपात्रालगत उभारण्यात येणाऱ्या वॉल कंपाउंडमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पाण्याचा प्रवाह बदलून आसपासच्या वस्त्यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या कामांची तातडीने पाहणी करून अनधिकृत उत्खनन आणि बांधकामे थांबविणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता पाटबंधारे आणि महसूल विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे समोर आले आहे. तहसीलदारांनी हा विषय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असल्याचे सांगितले, तर पाटबंधारे विभागाने महसूल विभागाकडे निर्देश केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नदीपात्रातील उत्खननाला परवानगी कोणी दिली, नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या वॉल कंपाउंडची कायदेशीर तपासणी झाली आहे का आणि भविष्यात पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
हेदवली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जोरकर यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले. प्रशासनाने पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाटबंधारे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करावी. नदीपात्रातील अनधिकृत उत्खनन आणि बांधकामे तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विभागीय समन्वयाचा अभाव
पाटबंधारे आणि महसूल विभागाकडून एकमेकांकडे जबाबदारी सोपवली जात असल्याने कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नदीपात्रातील अतिक्रमण आणि उत्खननाचा प्रश्न केवळ प्रशासकीय अधिकारापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे दोन्ही विभागांनी समन्वय साधून प्रत्यक्ष पाहणी करणे आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. पंधरा दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ व्यापक जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतोष जोरकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो ओळ, पाली, संतप्त ग्रामस्थ तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देताना. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, नदीपात्रात अवैधरीत्या होत असलेले उत्खनन. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, नदीपात्रात अवैधरीत्या सुरू असलेले बांधकाम. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.