बोईसर, ता. १ (वार्ताहर) : विराज प्रोफाइल्स कंपनीतील कर्मचारी प्रदीप जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. गर्ग यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील छळाचे आरोप आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने गर्ग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी बुधवारी (ता. २८) हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गर्ग यांना १० दिवसांची अंतरिम मुदत देण्यात आली आहे.
पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गर्ग यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. बोईसर येथील विराज प्रोफाइल्समधील वरिष्ठ कार्यकारी जाधव यांनी १९ जूनला आत्महत्या केली होती. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गर्ग यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
आत्महत्येच्या चिठ्ठीची न्यायालयाकडून दखल
प्रदीप जाधव यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जे. पी. गर्ग यांच्याकडून वारंवार छळ आणि अपमान होत असल्याचे नमूद केले होते. तसेच कामातील चुका शोधून त्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याने आपल्याविरोधात जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. उच्च न्यायालयाने या चिठ्ठीची दखल घेत प्रकरणातील आरोपांचे गांभीर्य विचारात घेतले.
वंदना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना यांनी पतीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गर्ग यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी जाधव कुटुंबीयांनी केली आहे.