पाणीटंचाई रोखण्यासाठी उपाययोजना करा
भरत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खारघर, ता. २५ (बातमीदार) : एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पनवेल तालुक्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिले आहे.
पनवेल तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसला, तरी बदलत्या हवामानामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागांचा समावेश असून, ग्रामीण भागात आजही शेती केली जाते. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या काळात शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी करावी, असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागांची प्राथमिक पाहणी करून त्यांची नोंद तयार करावी. गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. तसेच जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन, भाजीपाला उत्पादन आणि कमी खर्चातील शेतीपद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तालुक्यातील नद्या, ओढे, नाले, तलाव आणि विहिरींची संयुक्त पाहणी करून उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी योग्य ठिकाणी लघु बंधारे उभारणे, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, तलावांतील गाळ काढणे आणि भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेणे, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
महसूल, कृषी व जलसंधारण विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि पनवेल महापालिकेने समन्वयाने काम करावे. संभाव्य टंचाईग्रस्त क्षेत्रे निश्चित करून निधी, प्रशासकीय मंजुरी आणि कामांचे प्राधान्यक्रम ठरवावेत. त्यानुसार कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भरत पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.