महाड, ता. २६ (बातमीदार) : महाड महसूल विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात तालुक्यातील ७२ गावांचा संभाव्य दरडग्रस्त तर ४८ गावांचा अतिधोकादायक गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये खबरदारीचा उपाय योजना करण्यासाठी महसूल विभाग सज्ज झाले आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये एनडीआरएफचे पथकही महाड येथे मुक्कामी असेल.
महाड तालुका हा दरडग्रस्त व पूरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीचा सामना महाडकारांना करावा लागतो. तालुक्यात पारमाची या गावात १९९४ मध्ये दरड कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दरडी कोसळण्याचे सत्र तालुक्यात सुरूच राहिले. २००५ मध्ये तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो घरे बेघर झाली होती. २०२१ मध्ये तळिये गावावर दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता.
पावसाळा सुरू होताच महाड महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन सुरू केले असून धोकादायक गावांची यादी तयार केली आहे. यामध्ये ७२ गावे धोकादायक असून ४८ गावांना अधिक धोका आहे. अशा धोकादायक गावांची महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून गावांची वारंवार पाहणी केली जात आहे.
पाऊस वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी ग्रामस्थांना नोटिसाही बजावण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर धोकादायक गावातील ग्रामस्थ ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील, अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना महसूल विभागाने केल्या आहेत. गावातील शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय व इतर सुरक्षित ठिकाणी आवश्यकता वाटल्यास स्थलांतरित केले जाणार आहेत. अनेक वर्षांपासून महाड, पोलादपूर तसेच अन्य तालुक्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्ती ओढावत असल्याने व त्यात जीवितहानी होत असल्याने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची आवश्यकता असते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी आढावा बैठका
दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफचे पथक दाखल होईपर्यंत वेळ वाया जातो. त्यामुळे एनडीआरएफची गरज लक्षात घेता, महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदा एक जुलैपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत पथक महाड येथे कायमस्वरूपी मुक्काम असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत दोन आढावा बैठकाही झाल्या आहेत.
धोकादायक गावे
महाड तालुक्यातील तुडील, टोळ खु, मोरेवाडी (शिंगरकोंड), आंबिवली पातेरेवाडी, कोंडीवते, मुठवली, चांढवे खु, सव, रोहन, पुनाडे, कोथेरी जंगमवाडी, पाचाडवाडी, मुमुर्शी बौद्धवाडी, चोचींदे, गोठे बु, पारमाची, आदिस्ते, खैरे, वाळण, रेवतळे मानेची धार, मोहोत, वराठी, कुर्ले दंडवाडी, आंबेनळी, वामने, टोळबु, नवीन कोंडीवते, पिंपळकोंड, वलंग, शेलटोली, मुमुर्शी गावठाण, कुंबळे, चोचींदे कोंड, वीर, मुमुर्शी आंब्याचा कोंड, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, सांदोशी हेटकरकोंड, वीर मराठवाडी
धोकादायक गावांवर लक्ष देण्याकरिता विशेष अधिकारी नेमले आहेत. गरज भासल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्व तयारी करण्यात आली आहे.
- महेश शितोळे, तहसीलदार, महाड
दरडग्रस्त तळीये गाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.