महाड, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये श्वानदंशांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तीन महिन्यांत ग्रामीण भागातील २०४ जणांना तर शहरी भागात दोन महिन्यांत ८० नागरिकांना श्वानदंश झाला आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार मिळत असले तरी नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.
महाड हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने वनपट्टा व जंगली पशूंचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने ग्रामस्थांना सातत्याने शेत व जंगल भागांत वावरावे लागते. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक असतो. हीच स्थिती शहरी भागातही आहे. खाद्याच्या शोधात भटके कुत्रे टोळ्या करून वावरताना दिसतात. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग कुत्रे करीत असल्याने तोल जाऊन अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. लहान मुलांनाही भटके कुत्रे लक्ष्य करीत आहेत.
तालुक्यात गेल्या महिन्यात श्वानदंशाच्या तीन घटना घडल्या. यात कुत्रा चावल्याने लहान मुले जखमी झाली होती. शाळेत जाणाऱ्या तसेच मैदानात, घरासमोर खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्यांची झुंड हल्ला चढवत आहे. इमारती खाली, रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
शहरासह दोन-चार किलोमीटर परिसरातील श्वानदंश झालेले रुग्ण महाड ग्रामीण रुग्णालयात तर महाड तालुक्यामध्ये बिरवाडी, चिंभावे, दासगाव, पाचाड ,विन्हेरे व वरंध ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण गंभीर असेल तर त्याला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात येते.
तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २०४ नागरिक श्वानदंशाचे शिकार झाले आहेत. यातून ४२ जणांना रेबीजची लागण झाली आहे. महाडमध्ये तीन महिन्यांत रस्त्यावर, इमारतीत, बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून निर्बिजीकरण सुरू असले तरी त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलेले नाही. रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांची झुंड हल्ला करीत असल्याच्या घटनाही यापूर्वी घटल्या आहेत.
ग्रामीण भागामध्ये श्वानदंशानंतर सरकारी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी रेबीज लस तसेच इतर उपचार उपलब्ध असल्याने रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होते. महाड तालुक्यामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत योग्य उपचारामुळे एकही रुग्ण दगावला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
श्वान दंश
प्राथमिक आरोग्य केंद्र ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर
बिरवाडी ४० ३४ ३२
चिंभावे ३ २ ४
दासगाव ९ ८ ७
पाचाड ९ ७ ३
विन्हेरे ४ ९ १२
वरंध १२ ६ ९
......................................
महाड ग्रामीण रुग्णालय
ऑगस्ट ते सप्टेंबर - ८० श्वानदंश
श्वानदंशानंतर वेळ न घालवता त्वरित जवळील सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार घ्यावेत.
- डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधिक्षक, महाड ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रेबीज लस उपलब्ध असल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे रुग्णांचा
जीव वाचत आहे.
- डॉ. नितीन बावडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, महाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.