महाड , ता. ३ (बातमीदार) : सुमारे वीस कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महाड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील गैरसोयींबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या.
महाडमध्ये अनेक सोयीसुविधांनी सज्ज असे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात वीस कोटींचा निधी मंजूर करून स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर २००४ मध्ये स्मारकाचे लोकार्पण झाले. सुरुवातीला काही वर्षे समाज कल्याण विभागामार्फत स्मारकाची देखभाल-दुरुस्ती केली जात होती, परंतु २००८ पासून बार्टी पुणे या संस्थेला देखभालीचे काम देण्यात आले.
स्थापनेपासूनच सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, बाबासाहेबांच्या स्मृती जागवणारे भव्य असे संग्रहालय, नाट्यगृह, तरणतलाव, बहुउद्देशीय सभागृह यांसह अन्य विविध उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र काही वर्षांपासून सभागृहातील सोयीसुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्या असून यात नाट्यगृहाची वातानुकूलित व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, तरणतलाव, स्वच्छतागृह, स्मारक स्वच्छता व रंगरंगोटी इत्यादींचा समावेश होता. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बार्टी संस्थेमार्फत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून सध्या स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटीसह नाट्यगृहाच्या वातानुकूलित व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली आहे. कित्येक वर्षे बंद असलेला तरणतलावही काही महिन्यांपूर्वीच महाड नगरपरिषदेकडे कंत्राटी पद्धतीने वर्ग केला असून ती सुविधाही नागरिकांसाठी सुरू केली आहे. ग्रंथालय, अभ्यासिका यात आवश्यक मागणीनुसार बदल करून संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
विपश्यना केंद्र सुरू
बार्टी संस्थेतर्फे बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्मारक नूतनीकरणाच्या कामांची ९० टक्के पूर्तता झाली असून काही दिवसांतस्मारकाच्या सोयीसुविधा, सौंदर्यीकरण आणि स्वच्छता विषयक मोहिमेची पूर्तता होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. स्मारकातील नाट्यगृह तसेच बहुउद्देशीय सभागृहात सतत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. २००८ पासून विपश्यना केंद्र देखील सुरू करण्यात आले असून देश-विदेशातील अनेक साधकांनी लाभ घेतला आहे.
महाड ः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.