महाड, ता. ९ (बातमीदार) : माणगावमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात सर्व दिवाळीसाठी दोन हप्त्यांची आगाऊ भेट देण्यात आल्याने उपस्थित बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. एका बाजूला महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र कार्यक्रमासाठी खास जादा बस सोडण्यात आल्याने नेहमीच्या प्रवासाकरिता बस उपलब्ध न झाल्याने महाड स्थानकावर विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने खोळंबले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी माणगावमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण सरकारी योजनेच्या प्रसाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची गर्दी जमवण्यासाठी तालुक्यातील विविध भागांमधून जादा एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. महाड आगारातून तब्बल ९० बस सोडण्यात आल्या होत्या. दिवसभर सर्व ठिकाणी लाडकी बहीण योजनेचीच चर्चा होती. सकाळी मुलांना शाळेत सोडण्याकरिता आलेल्या महिला पालकांमध्ये कोणाच्या खात्यात किती पैसे जमा झाले, आज सर्वांचे पैसे जमा झाले आहेत अशा चर्चा रंगत होत्या. अनेक महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त तीन हजार रुपये जमा झाल्याचे बँकेचे मेसेज आल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे बस नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
कार्यक्रमानिमित्त महाड एसटी आगारातून माणगाव येथे जादा अतिरिक्त बस सोडल्याने दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी व प्रवाशांचा सकाळपासून खोळंबा झाला. याबाबत माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी एसटी प्रशासनाला फैलावर घेत खोळंबलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना ताबडतोब बस उपलब्ध करून देण्यास भाग पाडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.
महाड एसटी आगारातील गाड्या कार्यक्रमस्थळी रवाना करण्यात आल्याने जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी व प्रवासी महाड बस स्थानकावर ताटकळत उभे होते. यात लोणारे ते विद्यापीठात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. ठाकरे गटाचे चेतन पोटफोडे, सोमनाथ ओझर्डे, प्रफुल्ल धोंडगे, मंगेश देवरूखकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला फैलावर घेतले.
महाड ः बस नसल्याने आगारात विद्यार्थी व प्रवासी खोळंबले होते.
..............
नोकरदारांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : माणगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील महिलांना आणण्यासाठी २०० बस पाठवण्यात आल्या होत्या. प्रत्येक गावातून महिलांना आणण्याची जबाबदारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली होती; मात्र यामुळे नोकरी, शहरात मोलमजुरी करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला.
प्रवासासाठी महिलांकरिता ५० टक्के सवलतीची योजना असल्याने एसटीने नियमित प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या तिप्पट वाढली आहे; मात्र कार्यक्रमामुळे त्यांची गैरसोय झाली. नेहमीप्रमाणे त्या बसची वाट पाहत होत्या; परंतु ठरावीक वेळेची बस न आल्याने विचारणा केली असता, जिल्ह्यातील सर्व बस माणगाव येथील लाडकी बहीण कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले. अखेर अनेक महिलांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला. तर, काहींनी घरचा रस्ता धरला. बस नसल्याने प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. यात महिलांची संख्या जास्त होती.
मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. नेहमी अलिबाग बस डेपोमध्ये सकाळी नऊ वाजताची बस पकडण्यासाठी आले असता दीड तास वाट पाहिल्यानंतर ही बस आली नाही.
- सारिका पाटील, प्रवासी
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
माणगावातील मोर्बा गावात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, म्हणून माणगाव ते दिघी येथील महामार्गावरील अवजड वाहतूकही दिवसभरासाठी बंद करण्यात आली होती. ट्रेलर, कंटेनर, ट्रक, डंपर व इतर सर्व अशी अवजड वाहने ज्याची क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा सर्व जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली होती. या वाहनांसाठी म्हसळा-मांदाड तळामार्गे रोहा- नागोठणे, म्हसळा साई-तळेगाव तळा, इंदापूर, कनघर- खामगाव-पुरार फाटा- गोरेगावमार्गे मुंबई व गोव्याकडे जाण्याचा पर्याय खुला होता.
.................
खासगी वाहनांचा आधार
पोयनाड, ता. ९ (बातमीदार) : पोयनाड परिसरातून दररोज अलिबाग, पेण, नागोठणे, पनवेल येथे विद्यार्थी व नोकरदार मोठ्या संख्येने ये-जा करतात. बुधवारी बहुतांश एसटी बस माणगाव येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी गेल्याने पोयनाड परिसरात सर्व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. एसटी बस कमी असल्याने त्याचे नियोजन करणे व पूर्वसूचना देण्यात न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.