सुनील पाटकर, महाड ः
मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू असणारे हळदीकुंकू म्हणजे महिलांसाठी वेगळीच पर्वणी असते. यंदा वाण काय लुटायचे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगलेली दिसते. आपल्या घरी आदिशक्तीला बोलावून तिचे पूजन करणे अशी हळदीकुंकवाला धार्मिक मान्यता असली तरी एकमेकींविषयी बांधिलकी वाढवणारा असा हा समारंभ असतो.
ग्रामीण भाग असो की शहर, घरगुती, गृहसंकुले, सामाजिक मंडळ असो वा राजकीय व्यासपीठ सर्व ठिकाणी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पूर्वीच्या काळी शेतीच्या कामात, तसेच नेहमीच्या रामरगाड्यात अडकलेल्या महिलांकरिता हळदीकुंकू म्हणजे एक विरंगुळा असायचा. हल्ली अनेक महिला नोकरी व्यवसायानिमित्त दररोज धकाधकीचे जीवन जगत आहेत, त्यांच्यासाठीही हा समारंभ विरंगुळा ठरत आहे. यावर्षी रथसप्तमीपर्यंत ( ता. ४ फेब्रुवारी) हळदीकुंकू साजरे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
असे होते हळदीकुंकू
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. अशा आदिशक्तीला आपल्या घरी बोलून हळदीकुंकू लावून व एखादे वाण देत पूजन करणे, अशी प्रथा अनंत काळापासून चालत आली आहे. नवविवाहितांचा हळदीकुंकू समारंभातून इतर महिलांशी परिचय होतो. मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते. सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे, लाभदायक असते. आजूबाजूच्या महिलांना घरी आमंत्रित करून तिला तीळगूळ-फुटाणे एखादा गोड पदार्थ दिला जातो. शेवटी महिलेच्या ओटीमध्ये वाण दिले जाते. वाण म्हणजे भेट वस्तू. वाण म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे. या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते, असे मानले जाते. हळदकुंकू लावणे, अत्तर लावणे, गुलाबपाणी शिंपडणे, ओटी भरणे व वाण देणेहे हळदीकुंकवातील पंचोपचार मानले जातात.
वाण लुटीला महत्त्व
हळदीकुंकू म्हटले की महत्त्वाचे म्हणजे वाण. बाजारात वाण खरेदीला महिलावर्गाची गर्दी होत आहे. कोणाकडे काय वाण लुटले, याची चर्चा सतत होते. आधी स्टील, प्लॅस्टिकच्या वस्तू दिल्या जायच्या, मात्र आता चहा पावडर, साबण, पिशवी, साखर, गूळ, छोटी पेस्ट, लहान भांडी, स्वयंपाकघरातील उपयुक्त वस्तू, कुंकवाचा करंडा आदी वस्तूंचा वाणात समावेश झालेला दिसतो.
छोट्या पर्स, टिकल्यांचे पाकीट, बांगड्या, मेकअपचे सामान, पाउच, मोबाईल स्टँड, लिप बाम अशा अनेक आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. अगदी १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत हे वाण दिले जातात. काही महिला तुळशीचे व इतर रोपे, कापडी पिशव्या, बांबू वस्तू असे इकोफ्रेंडली वाण देत आहेत.
हळदीकुंकू इव्हेंट
धार्मिक हळदीकुंकवाची परंपरा आता इव्हेंट होत चालली आहे. सार्वजनिक व राजकीय हळदीकुंकू समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. येथे महिलांची गर्दी होण्यासाठी व राजकीय लाभासाठी मोठे वाण दिले जात आहे. व्यावसायिक संबंध वाढविण्यासाठी शॉपिंग सेंटर, मॉलमध्येही हळदीकुंकू समारंभ साजरे होत आहेत. यात महिलांना वेगवेगळ्या उत्पादनाच्या जाहिराती होण्याकरीता वाण दिले जात आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत, विविध सामाजिक मंडळे, ज्ञाती मंडळे येथेही महिलावर्गाची हळदीकुंकू समारंभाला हजेरी लावण्याची लगबग या काळात दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.