शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी
बचावकार्यात मदत करणाऱ्या संस्थेला दिला मदतीचा हात
महाड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील कांबळेतर्फे बिरवाडी गटातील २५ शिक्षकांनी एकत्र येत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपत्ती काळामध्ये संकटात सापडलेल्यांना मदत करणाऱ्या एडवेंचर्स सोल्स या संस्थेला बचावकार्यात लागणाऱ्या साहित्याची मदत या शिक्षकबांधवांनी केली आहे.
एडवेंचर्स सोल्स वेल्फेअर असोसिएशन ही संस्था गेली अनेक वर्षे महाड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात अनेक आपत्तीमध्ये बचावकार्य करत असते. याशिवाय छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले संवर्धन, वृक्ष लागवड व संगोपन आदी क्षेत्रात संस्थेचे काम सुरू आहे, परंतु संस्थेला बचावकार्यासाठी बचाव साहित्यांची कमतरता भासत होती. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विशाल खांबे यांनी कांबळेतर्फे बिरवाडी शिक्षक गटातील बीट विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सुधीर सकपाळ यांच्याकडे आपली गरज बोलून दाखवली. सुधीर सकपाळ यांनी त्वरित याची दखल घेत मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी लगेच आपल्या गटातील २३ शिक्षक ब बंधूंना संस्थेसाठी बचावकार्यात लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे रोप, हारणेस, हेल्मेट, टॉर्च, वॉकीटाकी, लाइफ जॅकेट आदी वस्तू देण्याचे आवाहन केले. त्याला या सर्व शिक्षकांनी प्रतिसाद दिला आणि या सर्व शिक्षकांनी एक सामाजिक बांधिलकी जपत संस्थेला मदतही केली.
ही मदत देण्यासाठी बिरवाडीतर्फे कांबळे केंद्रातील केंद्रप्रमुख सुधीर सकपाळ, शिवाजी यादव, विनायक शिंदे, किशोर खोपकर, अनुजा जाधव तसेच इतर शिक्षक उपस्थित होते. या शिक्षकांनी प्रत्येकी एक वस्तू स्वरूपात मदतीचा हात दिला आहे. सोमवारी (ता. १७) संस्थेकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विशाल खांबे, सचिव वैभव शेडगे, सदस्य प्रवीण सपकाळ, रजनीकांत माने, अमित गाडगीळ, व्यंकोजी लुश्टे, प्रतीक कालगुडे, माणिक खांबे व इतर सदस्य उपस्थित होते. केंद्रप्रमुख सुधीर सकपाळ यांनी या वेळी तालुक्यातील इतर शिक्षकदेखील मदतीसाठी पुढे येतील आणि संस्थेच्या कामात आपण एकीने हातभार लावून काम करू व संस्थेला आणखी काम करण्याची ताकद देऊ, असे आश्वासन दिले.
........
फोटो - केंद्रप्रमुख सुधीर सकपाळ व इतर शिक्षक संस्थेला मदत देताना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.