महाड, ता. १५ (बातमीदार) : महिनाभरामध्ये तापमानाने उच्चांक गाठल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम भूगर्भातील पाणीसाठा व नद्या नाल्यातील पाण्यावर झाला आहे. यामुळे महाड तालुक्यातील नागरिकांना आता पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यात आठ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी गावागावांतून मागणी वाढू लागली आहे.
महाड तालुक्यामध्ये सध्या ४२ अंश डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊ लागले आहे. यामुळे विहिरी, नद्या नाले यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे, तर भूगर्भातील पाणी पातळीदेखील कमी झाली आहे. गावांमध्ये नळ पाणी योजना असूनही पाण्याचे मूळ स्रोतच आटल्याने महाड तालुक्यातील आठ गावांना आता टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
महाड हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत जाऊन समुद्राला मिळते. उन्हामुळे पाणीटंचाईच्या झळा लवकर जाणवू लागतात. धरणे व नद्यांमधील पाण्याची पातळी उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस घटत आहे. महाड तालुक्यांमध्ये दरवर्षी सरासरी सुमारे दीडशे ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी आठ ठिकाणी दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवावे यासाठी गावांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात २५ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आली असून, त्यानुसार पंचायत समितीमार्फत व प्रांताधिकारी यांच्याकडे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी केली गेली आहे.
महाड तालुक्यामध्ये दरवर्षी सरासरी दीडशे गावे व वाड्याला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असतो. यंदा महाड तालुक्यातील पिंपळकोंड गाव आणि निगडे गावातील सात वाड्या या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याकरिता सध्या दोन टँकर अधिग्रहणदेखील करण्यात आले आहे, याशिवाय तालुक्यातील पाचाड, वारंगी, टोळ, सापे, कावळे तर्फे विन्हेरे अशा सुमारे २५ गावांतून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
उन्हाळ्यामुळे केवळ गावात येणाऱ्या टँकरवरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न पशुपालकांकडून निर्माण झाला आहे. गुरांना वेळच्यावेळी पाणी न मिळाल्यास याचा परिणाम दूध उत्पादनावरदेखील होतो. महाड तालुक्यामध्ये अनेक गवळ वाड्या असून, त्यांचा उदरनिर्वाह केवळ दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे गावात पाणी नसल्याने जनावरांना दूरच्या ठिकाणी पाण्यासाठी जावे लागत आहे.
चाकरमान्यांची संख्या रोडावली
उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्टी पडली की मुंबई, पुणे तसेच गुजरात भागामध्ये नोकरीसाठी गेलेले अनेक चाकरमानी दरवर्षी गावी येत असतात. शाळांना सुट्टी पडली की मुलेदेखील गावात मजा करण्यासाठी येतात, परंतु गावामध्ये वाढलेला उन्हाळा आणि निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई यामुळे चाकरमान्यांची गावाकडे येण्याची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. गावातील लग्नसराईवरदेखील पाणीटंचाईचा मोठा परिणाम जाणवत आहे. काही वर्षांपासून गावामध्ये होणारे विवाह सोहळ्याचा कमी झाले आहेत. पाणीटंचाईमुळे शहरातील लग्न सभागृहामध्ये विवाह लावण्याकडे आता ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे.
महाड तालुक्यात आठ ठिकाणी सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ज्या गावांची मागणी येत आहे, त्याचा प्रस्ताव त्वरित पंचायत समितीकडून प्रांत कार्यालयाकडे पाठवला जात आहे.
- डॉ. स्मिता पाटील, गटविकास अधिकारी महाड
फोटो - १. वीर आदिवासीवाडी येथील कोरडी पडलेली विहीर
२. नदीचे कोरडे पडलेले पात्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.