पोषक मूल्यांमुळे दुधाला ‘पूर्णान्ना’चा दर्जा
काळानुरूप रंग, स्वादात बदल; ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत
सुनील पाटकर, महाड
सकाळी सकाळी आपल्या कामाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने करायची असेल तर एक ग्लास दूध प्या. कारण भारतीय संस्कृतीमध्ये दुधाला पूर्णान्न मानले आहे. दैनंदिन जीवनात दुधाला मोठे महत्त्व आहे. आज आरोग्य व पोषणाव्यतिरिक्त दुग्धव्यवसाय हा जगभरातील अनेक कुटुंबांसाठी उत्पन्नाचा प्रमुख मार्ग ठरत आहे. बदलत्या काळानुसार दुधाचा रंग, दुधाचे विविध स्वाद, दुधाला येत असलेले शीतपेयाचे स्वरूप बदलले असले तरीही त्यातील पोषणमूल्य आजही कायम असल्याचे दिसते.
१ जून जागतिक दूधदिनानिमित्ताने दैनंदिन जीवनात दुधाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. २००१ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने एक जून हा जागतिक दूधदिन म्हणून घोषित केला. जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. दूध हे निरोगी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी कसे उपयुक्त आहे. आरोग्य आणि पोषण याबरोबरच दुग्धव्यवसाय हा अर्थव्यवस्थेला कसा हातभार लावतो. ग्रामीण भागातील बहुतांश अर्थव्यवस्थाही दुग्ध व्यवस्थेवर अवलंबून आहे, याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर एक चळवळ म्हणून साजरा केला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने व पौराणिक काळापासूनच पशुधन व दुधाला महत्त्वाचे स्थान असल्याने आज भारत जागतिक दूध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. सद्यःस्थितीत भारतात सर्वाधिक पशुधन व दुग्ध निर्मिती केली जाते. जागतिक उत्पादनामध्ये २५ टक्के योगदान भारताकडून आहे. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांनाही दूध व दुग्ध उत्पादनातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
वेगवेगळ्या स्वादाची क्रेझ
काळानुसार खाद्यसंस्कृती बदलू लागली आहे. शीतपेयांच्या जमान्यामध्ये नव्या पिढीला दूध पिण्याकडे कमीपणाचे वाटू लागले आहे. पूर्वी गवळी समाज मोठ्या प्रमाणात या व्यवसायात असे. आजही अनेक गवळ वाड्यांमधून शहरात मोठ्या प्रमाणात दूध पाठवले जाते; परंतु दुधाची कमतरता लक्षात घेता, अनेक दूध डेअरी या व्यवसायात उतरल्या आहेत. त्यामुळे आता बाजारपेठेमध्ये विविध रंगांचे, स्वादाचे दूध दिसू लागले आहे. लहान मुलांना आवडावे, यासाठी सुगंधी व स्वादिष्ट दूध तसेच वेगवेगळ्या स्वादामध्ये असणारे दूध उपलब्ध होऊ लागले आहे. बदाम, केशर, पिस्ता, स्ट्रॉबेरी, लिची अशा वेगवेगळ्या फळांच्या स्वादामध्ये दूध उपलब्ध होत असून लहान मुलांमध्ये क्रेझ वाढली आहे. दुधामध्ये कॅल्शियमचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी खास कॅल्शियमयुक्त दूध बाजारपेठेत उपलब्ध आहे. स्किम्ड दूध, टोन्ड दूध, देशी गाईचे दूध, गीर गाईचे दूध असे ए२ प्रकारातील दूध, चरबीयुक्त दूध, कमी चरबी असलेले दूध, लॅक्टोजमुक्त दूध असे दुधाचे अनेक प्रकार बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेले आहेत.
दुधाचे पॅक उपलब्ध
शीतपेय म्हणूनही दुधाचा वापर वाढू लागला आहे. न उकळता हे दूध थेट पिता येते. तुळस, हळद, आल्याची चव असलेले दूध ग्राहकांच्याही पसंतीस उतरले आहे. सहा महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतील, असे दुधाचे पॅकदेखील उपलब्ध असतात. बदलत्या काळानुसार व आहार संस्कृतीनुसार दुधामध्येदेखील बदल होऊ लागले आहेत. हे बदल स्वीकारत अनेक कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. दुधातील चरबीचे प्रमाण, पोषणमूल्ये व पोषण घटक याला कुठेही बाधा न देता पूर्णान्न असलेल्या दुधाला आजही मोठी मागणी आहे. कोट्यवधी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
दुधातील पोषण घटक
स्नायू आणि हाडांच्या विकासासाठी दूध महत्त्वाचे असते. दुधात जीवनसत्त्व अ, ड, बी १२, मोठ्या प्रमाणात प्रथिने कॅल्शिअम, फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम यांसारखी खनिजे, लॅक्टोज नावाचे कार्बोहायड्रेट व चरबी अशी अनेक पोषणमूल्य असल्याने दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.