महाड, ता. १ (बातमीदार) : पेरणीची कामे वेळेत व्हावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये वेळेपूर्वी भात बियाणे उपलब्ध झाले आहे. भात बियाण्यांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध असले तरीही यंदा बिगर मोसमी पावसामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. परिणामी भात बियाणे विक्रीमध्ये घट झाली असून, विक्रेते चिंतेत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असते. यंदा ८१ हजार ३३२ हेक्टरवर भातलागवडीचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात दरवर्षी २५ मेपासून पेरणीची कामे सुरू होतात. त्या दृष्टीने सर्व परवानाधारक दुकानांमध्ये २५ मेपूर्वीच संकरीत व सुधारित भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने पेरणीची कामे पूर्णपणे रखडली. पेरणी कशी करायची, या मनस्थितीमध्ये शेतकरी असल्याने सुमारे २५ टक्के शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
यंदा तब्बल ३५ वेगवेगळ्या भागांत बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. भात बियाण्यांचे भाव गतवर्षीच्या तुलनेत प्रतिकिलो पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात सुवर्ण जातीच्या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याने या बियाण्याला अजूनही मागणी आहे. यावर्षी खासगी बियाण्यांमध्ये श्री १०१लाही पसंती मिळत आहे. जिल्ह्यामध्ये हळवा, निमगरवा व गरवा या प्रकारांतील बियाण्यांची लागवड होते. त्या दृष्टीने बाजारात बियाणे उपलब्ध झाले आहे. पारंपरिक सुवर्ण, जया याचबरोबर कर्जत-२, रत्नागिरी, श्री १०१, रूपाली, कोमल, अभिरुची, सोनम, वैष्णवी, पूजा, जोरदार, तृप्ती, शुभांगी तसेच तांदळामध्ये प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलम या जातीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकीकडे भातलागवडीचे क्षेत्र कमी होत आहे तर दुसरीकडे मजुरांचा अभाव, खर्च वाढत असल्याने शेतकरी पेरणी करावी की नाही, या संभ्रमात आहे. त्यामुळे अनेकांनी अद्याप बियाणे खरेदीच केली नसल्याचे दिसून येत आहे.
लाल काळ्या भाताच्या लागवडीबाबत प्रश्नचिन्ह
रायगड जिल्ह्यामध्ये कृषी विभागाकडून यंदा लाल काळ्या भाताची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाड तालुक्यात २५ हेक्टर, पोलादपूरमध्ये १५, रोहा तालुक्यात २० हेक्टरवर या भाताच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु पेरणीच्या कामात झालेली दिरंगाई व पावसाने बसलेला फटका यामुळे लागवडीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्ह्याचा आढावा
भातपीक लागवड क्षेत्र - ८१ हजार ३३२ हेक्टर
भात बियाण्यांचा पुरवठा - १६ हजार २०० क्विंटल
बियाणे विक्रेते - २१४
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे, जातीचे नाव, बियाण्याच्या प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, उगवण क्षमता, शुद्धतेचे प्रमाण, वजन विक्रीची किंमत तपासून पाहावी. यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, चाचणीची तारीख आदी काळजीपूर्वक वाचाव्यात. अधिकृत विक्रेत्याकडूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती अवश्य घ्यावी. मुदतबाह्य किंवा पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करून नये.
बियाण्याची उपलब्धता
महाबीज – २,०५७ क्विंटल
खासगी – ४,४३९ क्विंटल
विद्यापीठ – ४०५ क्विंटल
एकूण – ६,९०१ क्विंटल
शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अशा सक्त सूचना सर्व कृषी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर कृषी विभागातर्फे भाताचे वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रांवरून खात्री करूनच बियाणे खरेदी करावे.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी
बियाण्याचे अनेक प्रकार दुकानात उपलब्ध आहेत. यंदा १० ते १५ टक्के भावात वाढ झाली आहे. परंतु पावसामुळे बियाण्यांची विक्री काही प्रमाणात कमी झाली आहे.
- प्रथमेश सोनार, बियाणे विक्रेता
महाड ः बियाणे खरेदी करताना शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.