वरंध घाटमार्गातील बंदी उठवा
खासदार सुनील तटकरे यांच्या सूचना; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार
महाड, ता. ३० (बातमीदार) : महाड वरंध घाटमार्गे पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवासी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरंध घाटमार्गातील वाहतूक बंदी उठवून तो त्वरित खुला करण्यात यावा, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांना केल्या आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे दिली.
महाड येथील सरकारी विश्रामगृहात सुनील तटकरे यांनी विविध सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रविवारी (ता. २९) आढावा बैठक घेतली. या वेळी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, सुभाष निकम, हनुमंत जगताप, नीलेश महाडिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीला प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपाधीक्षक शंकर काळे, महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, महेश पुरोहित, अशोक तलाठी उपस्थित होते. या वेळी महाड तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरंध घाटमार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एसटी वाहतूक बंद असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
महाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचा आढावा, अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. याशिवाय एसटी बसस्थानकांची सद्यस्थिती, बससेवा सुधारणा आणि ग्रामीण भागात एसटी बससेवा तत्काळ सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाल्यानंतर सुनील तटकरे यांची महाडमधील दौऱ्यात वाढ झाल्याची परिसरात चर्चा आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावरील तसेच घाट रस्त्यावरील वाहतूक अनेकदा बंद होते. त्यामुळे दरड हटवणे व इतर उपाययोजना त्वरित करण्यासाठी जेसीबी, पोकलेन व इतर उपकरणे सज्ज ठेवली जातात, परंतु यावर्षी अशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे बैठकीत सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच महाडच्या प्रांताधिकाऱ्यांना याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
प्रदूषणाचा प्रश्न गंभीर
महाड औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. औद्योगिक क्षेत्रातील ४० कारखाने सीईटीपीसी संलग्न नाहीत. या कारखान्यांनी सांडपाणी प्रक्रियेसाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, याचा अहवाल त्वरित द्यावा, अशा सूचना प्रांताधिकारी यांना बैठकीत देण्यात आल्या. वीरेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण व इतर समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.
महाड ः आढावा बैठकीत सुनील तटकरे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.