सुनील पाटकर, महाड
बुद्धीबळ या खेळाचे उगमस्थान भारतात असूनही अनेक वर्षे हा क्रीडा प्रकार प्रसिद्धीपासून दूर होता; परंतु जागतिक स्तरावर अनेक बुद्धीबळपटू चमकल्यानंतर भारतात बुद्धीबळ विस्तारताना दिसत आहे. याचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्यातदेखील दिसून येत असून काही वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात बुद्धीबळ स्पर्धा व बुद्धीबळ खेळाडू घडवण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यामध्ये अनेक नामांकित खेळाडू तयार होत असून जवळपास ५० खेळाडूंना फिडे नामांकन प्राप्त आहेत.
भारतामध्ये राजा-महाराजांच्या काळापासून बुद्धीबळ खेळला जात होता; परंतु हा खेळ राजघराण्यातला आहे, अशीच अनेकांची समजूत होती. त्यामुळे तो सामान्यांपासून काहीसा दूर होता; परंतु २००० मध्ये विश्वनाथ आनंद यांनी, जगज्जेतेपद मिळविल्यानंतर भारतामध्ये बुद्धीबळ रुजू लागला. यावर खऱ्या अर्थाने मात केली ती डी. गुकेश याने. केवळ १७ वर्षांच्या या खेळाडूने जगज्जेतेपद पटकावल्यानंतर भारतामध्ये बुद्धीबळाचा प्रसार अत्यंत वेगाने होऊ लागला. समाजमाध्यमांवर या खेळाचे रील्स, व्हिडिओ प्रसारित होत आहेत.
काही वर्षात रायगड जिल्ह्यामध्येदेखील बुद्धीबळ खेळाची व्यापकता वाढू लागली आहे. रायगड जिल्हा बुद्धीबळ संघटनेमार्फत पूर्वी होणाऱ्या स्पर्धांना अल्प प्रतिसाद मिळायचा; परंतु आता प्रत्येक तालुक्यांमध्ये बुद्धीबळाच्या स्पर्धा होत आहेत. अगदी पोलादपूर व मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पालकवर्गही लहान वयातच मुलांना बुद्धीबळ शिकवण्यासाठी पाठवू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर, महाड, गोरेगाव, उरण, रोहा, पनवेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने बुद्धीबळ स्पर्धा होत आहेत. आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धांची संख्याही वाढत आहे.
गोरेगाव येथील देशपांडे अकॅडमी, महाड येथील रहाळकर चेस अकॅडमी, कर्जत येथील आविष्कार अकॅडमी तर अलिबाग येथील एमर्स अकॅडमी अशा संस्थांमधून अनेक वर्षे बुद्धीबळाचे खेळाडू तयार होत आहेत.
रायगड जिल्हा संघटनेप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात बुद्धीबळ संघटना तयार झाल्या आहेत. पोलादपूरसारख्या ग्रामीण तालुक्यात तर गत आठवड्यात मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. ६०-७० वर्षांचे ज्येष्ठ खेळाडूदेखील या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. सर्वांच्या मेहनतीला फळ मिळत असून रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू फिडे रेटिंगमध्ये नामांकित झाले आहेत.
राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची दारे खुली
जिल्ह्यातील सुमारे ५० खेळाडूंना फिडे नामांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची दारे खुली झाली आहेत. यामध्ये अनेक खेळाडू नऊ वर्षांच्या खालील आहेत. जिल्ह्याला आता बुद्धीबळासाठीदेखील प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. राज्य व देशपातळीवर होत असलेल्या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असल्याने बुद्धीबळासारख्या एका चांगल्या खेळाला व्यासपीठ मिळू लागले आहे. २० जुलैला जागतिक बुद्धीबळ दिवस साजरा होत असताना जिल्ह्यात बुद्धीबळ क्रीडा प्रकाराची होत वाटचाल भविष्यासाठी प्रेरणा देणारी अशी आहे; परंतु क्रिकेट खेळासारखे ग्लॅमर्स व प्रायोजकता बुद्धीबळ खेळाला तितकीशी मिळत नसल्याची खंतदेखील खेळाडूंमध्ये आहे.
महाड ः नांदगाव येथे अलीकडेच बुद्धीबळ स्पर्धांचे आयोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.