गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी सुरू
महाड, ता. २६ (बातमीदार) : महाड वरंध घाटमार्गे पुणे हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्ट इशाऱ्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. तरीदेखील या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नसल्याने काही हौशी वाहनचालक घाटातून प्रवास करत होते, परंतु या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वरंध घाट बंद असल्याने ताम्हिणी घाटमार्गे अनेकांना प्रवास करावा लागत होता, तर घाटालगत असलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत होती. आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. रस्ता आता पुन्हा सुरू करण्यात येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील हद्दीतील रस्ता सुरू करण्याचे निर्देश जरी दिले असले तरी पुणे जिल्ह्यामध्ये मात्र या रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्याची अवस्था फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक या घाटातून प्रवास करण्यास धजावत नाहीत. पुणे जिल्ह्यामध्ये या रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतरच हा घाट वापरण्यास योग्य होणार आहे. सध्या घाटमार्ग सुरू असला तरीही अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवसांत वरंध घाट रस्ता पूर्णतः बंद ठेवला जाईल, अशा वेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.
....
फोटो - वरंध घाट