वाळणकुंड पर्यटनस्थळ दुर्लक्षित;
झुलता पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
महाड, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील वाळण येथील वाळणकुंड (वाळणकोंडी) या पर्यटनस्थळाची व याच ठिकाणी नदीवर असलेल्या झुलत्या पुलाची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे पुलाची दुरुस्ती रखडल्याने पर्यटकांची संख्या या ठिकाणी रोडावली आहे.
महाडपासून २० किलोमीटर अंतरावर वाळण येथे काळ नदीकाठी वरदायनी मातेचे स्थान आहे. तीव्र उतार आणि डोंगरदऱ्यांतून वाहत येणाऱ्या नदीचे पाणी पावसाळ्यातील रौद्ररूपामुळे वाळण या ठिकाणी एका जागी पडून मोठा डोह तयार झाला आहे. यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात. याच डोहात देवमासे असल्याचे सांगण्यात येते. देवमासे हे वाळणकोंडीचे मुख्य आकर्षण आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाचे असलेले हे ठिकाण सरकारी अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिले आहे.
१९९५ मध्ये युती सरकारच्या काळात या ठिकाणी रोपच्या सहाय्याने झुलता पूल बांधण्यात आला. हा पूल सध्या गंजून गेला आहे. पुलाला असलेल्या रोप (तारा) देखील तुटून गेल्या आहेत. यामुळे पर्यटक आणि भाविक मात्र दबकतच या पुलावरून चालत जातात. पावसामुळे हा पूल पादचारी व भाविकांसाठी बंद करण्यात आला होता. महाड तालुक्यात या प्रकारातील हा एकमेव पूल आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला असला तरी परिसर व पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याने पुलाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काळ नदी बचाव समितीच्या वतीने या पुलाची दुरुस्ती केली जावी, असे निवेदनदेखील प्रांताधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
सोयीसुविधांची गरज
या ठिकाणी अनेक भाविक व पर्यटक येत असतात, परंतु पिण्याच्या पाण्याची सोय, आसन व्यवस्था याची येथे वानवा आहे. या स्थळाचे नामफलकही केवळ स्थळाजवळ आहेत. अशाप्रकारचे आगळे-वेगळे पर्यटनस्थळ असूनही पर्यटन मंडळ व सरकार दरबारी याची फारशी दखल घेतली जात नसल्याने हे ठिकाण सरकारी अनास्थेचे बळी ठरले आहे.
फोटो - वाळणकुंड येथील पूल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.