सुगंधी उटणे तयार करून कौशल्य विकासाला चालना
करंजखोल जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
विक्रीतून मिळणारी रक्कम शाळेच्या उपक्रमांसाठी वापरण्याचा निर्धार
महाड, ता. १४ (वार्ताहर) : शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व देत, महाड तालुक्यातील करंजखोल जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘सुगंधी उटणे’ तयार करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या उटण्याच्या पाकिटांची विक्री करून जमा होणारी रक्कम शाळेच्या विकासात्मक उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ‘दी प्राइड इंडिया’ आणि ‘अवान्से फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ या संस्थांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये उत्पादन निर्मिती व उद्योजकतेची आवड निर्माण करणे हा आहे. करंजखोल येथील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण ५५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, सर्वांगीण बालविकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना उटणे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्याध्यापिका पूजा शहा, उपशिक्षिका मानसी केतकर, स्नेहल खातू, स्वप्नील बनसोडे, पोकळे, तसेच प्राइड इंडिया प्रकल्प प्रमुख सुप्रिया शिरशिवकर व शाळा समन्वयक भक्ती मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांनी बाजारातून गवत, कचरी, चंदन, गुलाब पावडर, वाळा, मुलतानी माती, आंबेहळद, तुळस, वेखंड यांसारख्या आयुर्वेदिक वनौषधी आणून विशिष्ट प्रमाणात त्यांचे मिश्रण तयार केले. या घटकांचे सुंदर पॅकेजिंग करून ‘जिल्हा परिषद शाळा करंजखोल’ असे नाव असलेली १००० पाकिटे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केली. १५ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या उटण्याच्या विक्रीतून मिळणारी नफ्याची रक्कम शाळेच्या उपक्रमांसाठी वापरणार आहोत, असे मुख्याध्यापिका पूजा शहा यांनी सांगितले. तर शिक्षिका स्नेहल खातू यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नियोजन आणि प्रात्यक्षिक शिक्षणाची जाणीव वाढते. केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता जीवनकौशल्य शिकविण्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.