महाडमध्ये भाजपशी युती राष्ट्रवादीच्या अंगलट
शिंदे गटाने मिळवली ५९ टक्के मते
महाड, ता. १० (बातमीदार) : तालुक्यामध्ये शिंदे गटाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये केवळ आपले वर्चस्वच राखले नाही, तर तब्बल ५९ टक्के मते मिळवत आपली ताकद अधिक वाढवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपशी युती महागात पडल्याचे समोर आले आहे. मुस्लिम मतदारांपासून राष्ट्रवादी काँग्रेस दुरावल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे.
महाड तालुक्यामध्ये शिंदे गटाचे वर्चस्व आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीप्रमाणे यावर्षीही शिवसेनेने मोठा विजय मिळवला, परंतु मतांचे प्रमाण वाढवण्यात शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. मंत्री भरत गोगावले यांना शह देण्याकरिता खासदार सुनील तटकरे यांनी भाजपची साथ घेतली. जिल्ह्यात असणारे शिवसेनेचे तीन आमदार व तटकरे यांच्यामध्ये उघड वाद असल्याने रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये संघर्ष होता. नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने शिंदे गटाविरोधात निवडणूक लढवली, परंतु भरत गोगावले यांचा लोकसंपर्क व शिवसेनेचा ठाम असलेला मतदार त्यातच मुस्लिम मतदारांनी दिलेली सेनेला साथ यामुळे शिवसेनेने केवळ विजयच मिळवला नाही, तर आपल्या मतांमध्येदेखील वाढ केली.
शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले असल्याने आगामी विधानसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरचना करणे आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील मतदार आजही शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे या निवडणुकीतून पुढे आले आहे.
पक्ष / युती, मिळालेली मते मतांची टक्केवारी
शिंदे गट ५५,८६४ ५९%
राष्ट्रवादी + भाजप युती २७,२२९ २९%
पराभवाची कारणे
* भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली हातमिळवणी तालुक्यातील मुस्लिम मतदारांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे मुस्लिमबहुल दासगाव मतदारसंघात शिंदे गटाचे मन्सुर ताज मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मुस्लिम मतदारांसोबतच कुणबी व मराठा समाज मतदारांनीदेखील शिंदे गटाला साथ दिल्याचे दिसून येत आहे.
* या मतदारसंघातील पंचायत समितीच्या दोन्ही जागादेखील शिंदे गटाने जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
* निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये केलेला प्रवेश हादेखील या विषयातील प्रमुख घटक मानला जातो.
* कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा या भागात झाली नाही याचा फटका देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.