महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
महाड, ता. २४ (बातमीदार) : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले आहे. महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रजेवर जात असहकार आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होत आहे.
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंध मंजूर करणे, मोजणी कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता निश्चित करणे, नियमबाह्य प्रतिनियुक्ती थांबवणे, खासगीकरणाचा निर्णय रद्द करणे आणि ई-मोजणी सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करणे, सुट्टीच्या दिवशी मोजणीच्या तारखा न ठेवणे आणि विभागाला तांत्रिक दर्जा देणे अशा प्रमुख मागण्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासकीय कामकाज केले. मात्र, शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कालबद्ध आराखड्यानंतरही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनाच्या काळात मोजणीसह सर्व शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असून, कर्मचाऱ्यांनी आपले मोजणी साहित्य आधीच कार्यालय प्रमुखांकडे जमा केले आहे.
आक्रोश मोर्चाचा इशारा
शासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारीला पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांची गैरसोय
या आंदोलनाबाबत महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. कालपासून जमीन मोजणी, नकाशे, उतारे व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात काम न होता परत जावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची ही मोठी गैरसोय झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.