चवदार तळे कामाबाबत महाड नगरपालिकेची विशेष सभा वादळी
५५ कोटींचे काम एमआयडीसीकडे वर्ग केल्याने सदस्यांची नाराजी; कडक अटींसह ठराव मंजूर
महाड, ता. १० (बातमीदार) ः ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभीकरण आणि गाळ काढण्याच्या कामावरून शुक्रवारी (ता. १०) आयोजित महाड नगरपालिकेची विशेष सभा वादळी ठरली. हे काम महाड नगरपालिकेकडून काढून एमआयडीसीला देण्याच्या सरकारी निर्णयावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. मात्र, सविस्तर चर्चेअंती काही अटी घालून ठराव मंजूर करण्यात आला.
नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाड नगर परिषदेच्या विशेष सभेला उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नगर अभियंता प्रवीण कदम आणि नगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. चवदार तळ्यातील सुशोभीकरण व जलशुद्धीकरण याकरिता ५५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, हे काम एमआयडीसीला दिल्याबद्दल सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हे काम करण्याकरिता नगरपालिका सक्षम नाही का किंवा हे काम एमआयडीसीकडे वर्ग करण्याचे कारण काय याबाबत संदीप जाधव, बांधकाम सभापती सुमित पवार, नगरसेवक हेमंत चांदलेकर तसेच इतर नगरसेवकांनी विचारणा केली. संदीप जाधव यांनी यापूर्वीचा दाखला देत तात्कालीन नगराध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी नगरपालिकेच्या हद्दीतील काम करण्यास अन्य यंत्रणांना परवानगी न देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे जाणीव करून दिली. चर्चेअंती एमआयडीसीला चवदार तळ्यातील काम करण्याबाबत महाड नगरपालिकेने आजच्या सभेत काही अटी घालून ठराव मंजूर केला आहे. नगर अभियंता प्रवीण कदम यांनी या सभेत पालिकेने तयार केलेला सविस्तर प्रकल्प आराखडाच एमआयडीसीने मंजूर केलेला आहे. त्यामध्ये कोणतेही तांत्रिक बदल केलेले नाहीत. त्यामुळे नगरपालिका काम करण्यास अकार्यक्षम आहे असे बोलणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. हे काम एमायडीसीकडे वर्ग करण्याचा निर्णय सरकारी असल्यामुळे तो मान्य करावा लागेल, असेही सुनील कविस्कर यांनी सभेत सांगितले. दरम्यान, उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी चवदार तळ्यातील गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी मिळण्यापूर्वीच व नगरपालिकेची कोणती परवानगी न घेता एका ठेकेदाराने बेकायदेशीरपणे तळ्यातील पाण्याचा उपसा केला. या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
‘या’ अटींवर ठराव मंजूर
एमआयडीसीने चवदार तळ्याच्या कामाचे नगरपालिकेपुढे पूर्णपणे सादरीकरण करावे, काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक असावे, काम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद खात्री करूनच ना हरकत दाखला देऊन देखभाल दुरुस्तीसाठी हे काम ताब्यात घेईल, या कामासाठी राहणारा विद्युतपुरवठा ठेकेदाराने स्वखर्चाने घ्यावा, शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे एमआयडीसीने ही यंत्रणा चालवावी व त्यानंतर सुस्थितीत असलेली यंत्रणा नगरपालिका हस्तांतरित करून घेईल. या कामांमध्ये नगरपालिका अधिकारी अथवा पदाधिकारी यांनी काही त्रुटी व उणिवा दाखवल्यास त्या दूर करण्याची जबाबदारीदेखील एमायडीसीची राहील, काम करताना कोणत्याही प्रकारची तोडफोड झाल्यास त्याची दुरुस्तीदेखील एमआयडीसीला करून द्यावी लागेल, अशा प्रकारच्या काही अटी नगरपालिकेकडून घालण्यात आलेल्या आहेत.
पाणीटंचाईबाबत ठोस उपाय
तळ्यातील पाण्याचा उपसा केल्यानंतर चवदार तळे परिसरामध्ये असलेल्या विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी घसरून या भागात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याची सोय करण्याचा विचार केला जावा, अशा सूचनाही बांधकाम सभापती सुमीत पवार व संदीप जाधव यांनी केल्या. या चर्चेमध्ये नगरसेवक प्रमोद महाडिक यांनीदेखील टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत तरतूद केली जावी असे सुचवले. या वेळी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी चवदार तळ्याचे काम लवकर पूर्ण करायचे असल्याने या कामाला सर्वांनी सहकार्य करावे तसेच परिसरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत नगरपालिका निश्चितच विचार करेल, असे आश्वासन सभागृहाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.