रायगडात ‘उल्लास’ साक्षरता मोहिमेला भरघोस प्रतिसाद
नवसाक्षरांचा आत्मविश्वास उंचावला
महाड, ता. १२ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यात ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, साक्षरतेचा प्रकाश अधिक व्यापक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षेत तब्बल तीन हजार ६८ नवसाक्षरांनी सहभाग नोंदवला.
जिल्हाभरातील एक हजार ७७३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. १५ वर्षांवरील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. परीक्षेत दोन हजार ५०८ महिला व ५६० पुरुष सहभागी झाले. महिलांमध्ये वाढत असलेली शैक्षणिक जाणीव यामुळे स्पष्ट झाली.
या परीक्षेत वाचन, लेखन व संख्याज्ञान या तीन घटकांसाठी प्रत्येकी ५० गुण ठेवण्यात आले होते. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान १७ गुण आवश्यक होते. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेत, शिकण्याला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले. जिल्हा शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
चौकट
साक्षरतेतून सामाजिक सक्षमीकरण
‘उल्लास’ अभियानामुळे केवळ वाचन-लेखन कौशल्यच नव्हे, तर डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढविण्याचा मार्ग खुला झाला आहे. २०२७ पर्यंत सर्व निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांचा सर्वांगीण विकास साधण्याची दिशा मिळत आहे.
कोट
शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांनी गावागावात सर्वेक्षण करून निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. उल्लास साक्षरता परीक्षेसाठी जिल्हा शिक्षण विभागाने परीक्षेचे काटेकोर नियोजन केले होते.
- महारुद्र नाळे (शिक्षणाधिकारी -माध्यमिक)
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.