ग्रामीण भागात आजही परंपरागत अंदाजांना महत्त्व
पावसाची गमतीशीर नावे आणि नक्षत्रांची वाहने
महाड, ता. २४ (बातमीदार) : हवामान खात्याच्या अंदाजांबरोबरच ग्रामीण भागात आजही नक्षत्रे आणि त्यांच्या वाहनांवर आधारित पावसाचे अंदाज बांधण्याची परंपरा कायम आहे.
ग्रामीण संस्कृतीत पावसाला विविध गमतीशीर आणि नातेसंबंधाशी निगडित नावे देण्यात आली आहेत. पुनर्वसु नक्षत्रातील पाऊस ‘तरणा पाऊस’, पुष्य नक्षत्रातील ‘म्हातारा पाऊस’, मघा नक्षत्रातील ‘सासूचा पाऊस’ तर पूर्वा फाल्गुनीतील पाऊस ‘सुनेचा पाऊस’ म्हणून ओळखला जातो. याशिवाय हत्तीचा, रग्बीचा आणि असलकाचा पाऊस अशीही विविध नावे प्रचलित आहेत.
नक्षत्रांच्या वाहनांवरूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. हत्ती, बेडूक आणि म्हैस ही वाहने मुसळधार पावसाची चिन्हे मानली जातात, तर उंदीर, गाढव आणि मेंढा ही कमी पावसाची, मोर, कोल्हा आणि घोडा ही वाहने मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देतात. या पद्धतीला वैज्ञानिक आधार नसला तरी अनेक ज्येष्ठ शेतकरी त्यावर आजही विश्वास ठेवतात.
चौकट
नक्षत्रांच्या वाहनांवरून कसा बांधतात पावसाचा अंदाज?
सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्राच्या नक्षत्रापर्यंतची संख्या मोजून तिला नऊने भाग दिला जातो. उरलेल्या बाकीप्रमाणे वाहन निश्चित केले जाते. शून्य बाकी राहिल्यास हत्ती, एक घोडा, दोन कोल्हा, तीन बेडूक, चार मेंढा, पाच मोर, सहा उंदीर, सात म्हैस आणि आठ गाढव असे वाहन ठरते. जून ते ऑक्टोबरदरम्यानच्या ११ पावसाळी नक्षत्रांवर आधारित हा परंपरागत अंदाज ग्रामीण भागात आजही चर्चेचा विषय ठरतो.
चौकट
यावर्षीची नक्षत्रे व वाहने
२२ जून आर्द्रा - गाढव,
६ जुलै पुनर्वसु - घोडा,
२० जुलै पुष्य- उंदीर,
३ ऑगस्ट आश्लेषा - हत्ती,
१७ ऑगस्ट मघा - मोर,
३० ऑगस्ट पूर्वा फालगुनी- गाढव,
१३ सप्टेंबर उत्तरा फाल्गुनी - बेडूक
२७ सप्टेंबर हस्त- उंदीर,
१० ऑक्टोबर चित्रा- घोडा,
२४ ऑक्टोबर स्वाती - बेडूक