पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला बळ
महाडमध्ये सामाजिक संस्थांचा पुढाकार; ५००हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्याचे उद्दिष्ट
महाड, ता. १३ (बातमीदार) : पर्यावरणाचे संवर्धन करत गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ महाड आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरात विसर्जन तलाव उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन नदी-नाले किंवा अन्य जलस्रोतांऐवजी याच तलावांमध्ये करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षी या उपक्रमांतर्गत सुमारे २०० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवसाच्या विसर्जनावेळी ५००हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलप्रदूषण रोखणे, नदी-नाले व जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमासाठी सीस्केप, रंगसुगंध, अक्षरशिल्प, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट, महाड शहर विकास मंच, श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था, नाते लायन्स क्लब, पुनरावर्तन पुणे, सेल्फ, कृषी महाविद्यालय महाड आणि स्वराज्य आदी संस्थांचा सहभाग आहे. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
शहरात चार ठिकाणी व्यवस्था
महाड शहरात रावसाहेब भिलारे मैदान (काकरतळे), महाड नगर परिषद, महाड शाळा क्रमांक ५ मैदान आणि होडी बंदर (सावित्री घाटाजवळ), कोट आळी येथे विसर्जन तलाव उभारले जाणार आहेत. प्रत्येक तलावाची लांबी १५ फूट, रुंदी तीन फूट आणि खोली चार फूट असेल. विसर्जनानंतरची माती मूर्तिकारांना मोफत देण्यात येणार आहे. निर्माल्यापासून तयार होणारे कंपोस्ट खतही गणेशभक्तांना मोफत देण्यात येणार आहे. या व्यवस्थेचा वापर करणाऱ्या भाविकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे रोटरी क्लबचे डॉ. चेतन सुर्वे यांनी सांगितले.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.