उद्या गौराई येणार अंगणी
रायगड जिल्ह्यात उत्साह
महाड, ता. १६ (बातमीदार) : जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान सुमारे १७ हजार गौराईंचे आगमन आज उत्साहात होणार असून, शुक्रवारी (ता. १८) गौरी पूजन केले जाणार आहे. गौरी पूजनाचा मान मुख्यत्वे माहेरवाशीणीचा असल्याने तिच्या स्वागतासाठी आणि पूजेच्या तयारीसाठी महिलावर्गाची मोठी लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये व दक्षिण भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरेनुसार आगमन व गौरीपूजन केले जाते. गौरी हे पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे महिला शक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. घरी येणाऱ्या गौरीची अनेक रूपे आहेत. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा स्वरूपामध्ये गौरी पूजन केले जाते.
पारंपरिक पद्धतीने स्वागत
गावाजवळील आणि घराजवळील ठिकठिकाणच्या विहीरी, नद्या आणि पाणवठे या ठिकाणी सुवासिनी आणि मुली एकत्र जमतात. डोंगरातून तसेच जंगल भागातून तेरड्याची फुले आणून यावर गौरीचा मुखवटा चढवला जातो. झिम्म्याचे फेर धरतच गौरीच्या डहाळ्याची पूजा करण्यात येते. यानंतर पारंपरिक वाद्याच्या निनादात गौरी आपआपल्या घरी नेल्या जातात. काही ठिकाणी गौरी मूर्ती स्वरूपात काही ठिकाणी केवळ मुखवटे, काही ठिकाणी तेरडा अथवा रोपांच्या रूपात तर काही भागांमध्ये खड्यांच्या स्वरूपात गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी पितळेचे, तर काही ठिकाणी मातीचे मुखवटेदेखील असतात. निसर्गातील शक्तीची निसर्गातील साधनांच्या माध्यमातून पूजा करणे व त्या निसर्गातच विलीन करणे हा या मागचा मूळ उद्देश असतो.
बाजारपेठा गजबजल्या
गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ठूशी, मंगळसूत्र, नथी, कंबरपट्टी, गौरी मुकूट, बोरमाळ, मोहनमाळ आदी साहित्यांना महिलावर्गाकडून मागणी आहे. गौरी पूजनासाठी लागणारे सामान खरेदी करण्याकरिता तसेच गौरीला नैवेद्य म्हणून १६ भाज्या दाखवल्या जातात. त्याची खरेदी करण्यासाठीदेखील महिलावर्गाची बाजारात गर्दी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.