सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अंधेरी एमआयडीसीच्या जिजामाता रोडजवळील एका चाळीत राहणाऱ्या पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांवर सध्या जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत; तर एकाचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. राम यादव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या पाचही व्यक्ती बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील सोहरबा गावातील रहिवासी आहेत. राम यादव हे नोकरीसाठी नुकतेच मुंबईत आले होते. १५ ऑगस्टच्या रात्री सर्वांनी घरी डाळ, भात आणि चोखा बनवून खाल्ला होता. त्यानंतर ते सकाळी उठलेच नाहीत. यातील एकाचा मृत्यू झाला असून चार जण बेशुद्ध होते. त्यातील श्रवण यादव (वय ३२), दीपक यादव (वय १८) हे शुद्धीत आले आहेत; तर कृष्णा यादव आणि गोविंद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांनी दिली. हा प्रकार का घडला याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी तपास केला असता दूषित अन्न आणि मद्य - कोल्ड ड्रिंकचे कॉकटेल सापडले; पण तपासात विषबाधेचे कोणतेही स्पष्ट कारण आढळून आले नाही. अहवालात कोणतीही स्पष्टता नसल्याने रुग्णांकडून कच्ची दारू, फिनाईल, डास किंवा झुरळ फवारणी किंवा उंदराला मारण्यासाठी वापरले जाणारे विष प्राशन केले गेले असावे, असे गृहीत धरून उपचार केले जात आहेत. आम्ही त्यांच्या पोटातील पाणी आणि रक्ताचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. लॅबचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.
......
आम्ही सर्व एकाच गावचे आहोत. १५ ऑगस्टला माझ्या भावाने मला जेवायला बोलावले होते. मी टुरिस्ट बस चालवतो, म्हणून मी नकार दिला. माझा लहान भाऊ दीपक बाईक मेकॅनिकचे काम शिकत आहे. दुसरा भाऊ फरशा बसवण्याचे काम करतो. दीपकने मला सांगितले होते की, १५ ऑगस्टच्या रात्री तो बाहेरून परतला तेव्हा घरात जेवण तयार होते. आम्ही रात्री जेवलो आणि सकाळी उठलोच नाही.
- मिथिलेश यादव, दीपकचा भाऊ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.