मुंबई, ता. २१ : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल यंदाही सर्वात कमी लागला आहे. राज्याच्या तुलनेत केवळ ९१.९५ टक्के निकाल लागला असून यावेळी मुंबई विभागातून मुलींनीच बाजी मारली आहे. या विभागात मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा विभाग येतो. यामध्ये सर्वाधिक निकाल रायगड जिल्ह्याचा ९३.६७ टक्के असून सर्वात कमी निकाल हा मुंबई शहराचा ८५.६८ टक्के या जिल्ह्याचा आहे. तर मुंबई उपनगरचा ८९.४६ टक्के, पालघर- ९२.७६ टक्के आणि ठाणे जिल्ह्याचा ९०.३९ टक्के इतका आहे.
मुंबई विभागात तीन लाख १९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी दोन लाख ९४ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.९५ टक्के आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८८.१३ टक्के इतका लागला होता. त्यामानाने यंदा मुंबईच्या निकालात ३.८२ टक्क्यांची वाढ झाली असली तरी राज्याच्या एकूण निकालाच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी आहे. तर दुसरीकडे यंदा मुंबईतून गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचेही समोर आले आहे.
यंदा मुंबई विभागाचा कला शाखेचा निकाल सर्वात कमी ८३.५६ टक्के इतका लागला आहे. तर सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९६.३५ टक्के आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९०.८८ टक्के असून व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआयचा निकाल अनुक्रमे ९०.८५ आणि ८६.१० टक्के लागला आहे. मुंबई विभागात विज्ञान शाखेत रायगड विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७४ टक्के, कलामध्ये मुंबई उपनगरचा निकाल ९०.३३, वाणिज्य शाखेत रायगड जिल्ह्याचा निकाल ९५.२२ तर व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखेचा ठाणे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक अनुक्रमे ९३.६६ आणि ८९.६७ टक्के इतका लागला आहे.
--
निकाल घटण्याची कारणे
निकाल कमी लागण्यासाठी मुंबई विभागाने कॉपी प्रकरणांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणले होते, यामुळेही निकाल कमी लागला असावा, असे सांगण्यात येते. तर मुंबई विभागात १७ नंबरचा अर्ज भरून बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकची संख्या ही तब्बल ४५ हजार ९७२ इतकी असल्याने त्याचेही परिणाम निकालावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई विभागीय निकाल (टक्केवारी)
शाखा निकाल
कला ८३.५६
विज्ञान ९६.३५
वाणिज्य ९०.८८
व्यवसाय अभ्यासक्रम ९०.८५
आयटीआय ८६.१०
--
विभागीय निकालाची टक्केवारी
जिल्हा टक्केवारी
मुंबई-१ ८९.४६
मुंबई ग्रेटर ८५.६८
पालघर ९२.७६
रायगड ९३.६७
ठाणे ९०.३९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.