बारावीच्या परीक्षेत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
यंदाही मुलींचीच बाजी; दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वाधिक निकाल
मुंबई, ता. २१ : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात दोन टक्क्यांहून वाढ झाली आहे. या परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी ९३.३७ इतकी आहे.
यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा एकूण निकाल ९५.४४ टक्के इतका; तर मुलांचा निकाल हा ९१.६० टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी ही ३.८४ टक्क्यांनी अधिक आहे. बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी - मार्च महिन्यांत एकूण १५४ विषयांत घेण्यात आली होती. यात २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला. मंडळाने या वेळी विक्रमी वेळेत निकाल जाहीर केला आहे. मंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांत सर्वाधिक निकाल हा यंदाही कोकण विभागाचा ९७.५१ टक्के इतका आहे; तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका आहे. नऊ विभागापैकी चार विभागाचा निकाल ९४ टक्क्यांच्या वर आहे. यात पुणे ९४.४४, छत्रपती संभाजीनगर ९४.८, कोल्हापूर ९४.२४ आणि नाशिक विभागाचा ९४.७१ टक्के असा निकाल आहे; तर उर्वरित नागपूर ९२.१२, लातूर ९२.३६ टक्के आणि अमरावती ९३.०० टक्के इतका निकाल आहे; तर पुनर्परीक्षार्थीमध्ये २२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण टक्केवारी केवळ ४९.८२ इतकी आहे.
या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वाधिक असा ९४.२० टक्के निकाल लागला आहे. राज्यभरातून ६ हजार ९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६ हजार ५८१ उत्तीर्ण झाले आहेत; तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंद केलेल्या ४० हजार ९९५ पैकी ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा एकूण निकाल ८५.७६ टक्के इतका आहे.
..
२१ महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल
बारावीच्या परीक्षेत राज्यातील तब्बल २१ कनिष्ठ महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. यात १३ आयटीआय आणि इतर संस्थांचा समावेश; तर दुसरीकडे २ हजार २४७ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
..
८ हजार ७८२ जण नव्वदीपार
बारावीच्या परीक्षेत ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत; तर प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७५ टक्के व त्याहून अधिक गुण १ लाख ९० हजार ५७० विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी मुंबईतील ४५ हजार ९७२ इतके आहेत; तर संख्येनुसार सर्वात कमी कोल्हापूर विभागात ८ हजार ५६३; तर पुणे विभागातील २९ हजार २२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत २० हजार २१० विद्यार्थ्यांना क्रीडा आदी कोट्याचा लाभही मिळाला आहे.
..
असा आहे मुंबईचा निकाल
मुंबई विभागातून एकूण ३ लाख १९ हजार ९१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात २ लाख ९४ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९१.९५ टक्के इतका आहे. यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.२२ टक्के; तर मुलींचे प्रमाण ९३.८० टक्के इतके आहे.
--
निकालाची एकूण टक्केवारी
विभाग टक्केवारी
पुणे ९४.४४
नागपूर ९२.१२
छत्रपती संभाजीनगर ९४.०८
मुंबई ९१.९५
कोल्हापूर ९४.२४
अमरावती ९३.००
नाशिक ९४.७१
लातूर ९२.३६
कोकण ९७.५१
एकूण ९३.३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.